युथ फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ज्ञानसंपदा वाचनालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

चांगभलं ऑनलाइन | कोळे
ग्रामीण भागामध्ये वाचनालय उभे राहणे हे गावातील लोकांच्या ज्ञानसंवर्धनासाठी, सामाजिक प्रगतीसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी एक महत्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती श्री.महेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
कोळे (ता. कराड) येथील युथ फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या “ज्ञानसंपदा वाचनालयाचे” उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोळे पोलीस स्टेशनचे पी.आय. सचिन भिलारेसाहेब तर प्रमुख उपस्थित डॉ.प्रभाकर देसाई, डॉ.सौ.हर्षाली पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मानसिंग राजे उपस्थित होते.
कोळे येथे युथ फाउंडेशन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या “ज्ञानसंपदा वाचनालयाचा” उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बुद्धीची देवता असलेल्या सरस्वती पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रारंभी कोळे गावचे सुपुत्र ज्येष्ठ उद्योगपती श्री.महेश देशपांडे यांच्या शुभहस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
गावातील लोकांसाठी वाचनालय निर्माण करणे हे आजच्या काळातील महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगून महेश देशपांडे पुढे म्हणाले, ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा अनेकदा कमी असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना शैक्षणिक साधने मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत वाचनालये ग्रामीण भागातील लोकांसाठी ज्ञान आणि माहितीचा महत्त्वाचा स्त्रोत ठरत आहेत. विद्यार्थ्यांना वाचनालयांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक साधने आणि पुस्तके उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे त्यांचे शिक्षण अधिक प्रभावी होत आहे, असे प्रतिपादन श्री.महेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
प्रा.डॉ.सागर लटके-पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले.आपल्या प्रास्ताविकेतून त्यांनी युथ फाऊंडेशनचा उद्देश सांगून युथ फाउंडेशनने आजपर्यंत केलेल्या कामाचा धावता आढावा घेतला.
पी. आय. सचिन भिलारे म्हणाले, ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा अनेकदा कमी असतात त्यामुळे वाचनालय विद्यार्थ्यांना आणि लोकांना शैक्षणिक साधने आणि पुस्तके उपलब्ध करून देतात, ज्यामुळे त्यांना चांगले शिक्षण घेण्यास मदत होते असे प्रतिपादन करून युथ फाउंडेशनच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रभाकर देसाई यांनी आपल्या मनोगतातून वाचनालये ही सांस्कृतिक गरज असल्याचे सांगून वाचनालयास शुभेच्छा दिल्या.
डॉ.मानसिंग राजे म्हणाले, वाचनालये केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक विकासातही मोलाची भूमिका बजावत असतात. अनेकदा ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा मर्यादित असल्यामुळे वाचनालय ही ज्ञान आणि माहिती मिळवण्याची एकमेव जागा ठरते.लोकांना पुस्तके आणि मासिकांद्वारे विविध सरकारी योजना, कृषीविषयक माहिती, तसेच आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या बाबींविषयी माहिती मिळत असल्याचे प्रतिपादन डॉ. राजे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रा.विलास सपकाळ यांनी मानले.सूत्रसंचालन श्री.अनिल लोकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.समीर संदे, उपाध्यक्ष सुनील देसाई, सचिव प्रा.डॉ.सागर लटके-पाटील, खजिनदार श्री.बबन सपकाळ, युथ फाउंडेशनचे सदस्य श्री.अर्जुन कराळे, श्री.संजय माळी, श्री.अमोल कांबळे, श्री.हणमंत उर्फ राजू चव्हाण, सौ.संगीता लोकरे, श्रीकांत गरुड, ओंकार देशमुख, सौ.स्वप्नाली चव्हाण, शंभूराज चव्हाण, सौ.अर्चना कराळे, सौ.स्वाती माळी, सौ.स्वाती राजे यांनी केले.
यावेळी सरपंच श्रीमती लतिफा अमानुल्ला फकीर, उपसरपंच श्री.सुधीर कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.