सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वनालगतच्या गावांसाठी ‘ही’ योजना ठरतेय यशस्वी ; वनावरील अवलंबित्व कमी होण्यास होणार मदत
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
गावातील संसाधनांची उत्पादकता व पर्यायी रोजगार संधी वाढवून वनावरील अवलंबत्व कमी केल्यास मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी होऊन सहजीवन प्रस्थापित होऊ शकते. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बामणोली वनपरिक्षेत्रातील संरक्षित क्षेत्रालगतच्या गावांमध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्वाचा ठरणार आहे. हा सहभाग घेऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्या माध्यमातून गावे स्वयंपूर्ण बनविणार आहे , असे प्रतिपादन बामणोली (वन्यजीव) वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी केले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा नजीकच्या अंबवडे येथे सार्वजनिक साहित्य वाटप तसेच आयोजित बैठकीत ते बोलत होते.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक मनिकंदा रामानुजम, उपसंचालक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक रविकांत डेंगरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रातील सर्व गावांमध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातून पर्यटन वाढीसाठी तसेच स्थानिकांचे वनावरील अवलंबित्व पूर्णपणे कमी करून वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन करण्याचा वन विभागाचा प्रयत्न सुरू आहे, असे ही विजय बाठे यांनी सांगितले.
बाठे म्हणाले की, वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपामुळे हस्तक्षेप मानव व वन्य प्राणी संघर्ष वाढला आहे. त्यातून अनेकदा अनुचित घटना घडतात. हा संघर्ष कमी करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना लाभदायक ठरणार आहे. जे लोक वनाच्या आसपास राहतात, अशा गावातील लोकांचे वनावरील अवलंबन कमी करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामुहीक प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, अंबवडे येथील निसर्ग पर्यटन संकुल आवश्यक ती दुरुस्ती करून लवकरच पर्यटकांसाठी खुले करण्यात येईल. यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी वनपाल संदीप पवार, वनरक्षक जयंत निकम, ग्रामसेवक समाधान जाधव, वनसमिती अध्यक्ष अक्षय गोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना काय आहे
जंगला नजीकच्या गावामध्ये जन, जल, जंगल, जमीन या संसाधनाचा विकास साधून उत्पादकता वाढविणे, वनावरील अवलंबित्व कमी करून शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे, स्थानिकांना पर्यायी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करून, स्थानिकांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.
– विजय बाठे
वनपरिक्षेत्र अधिकारी बामणोली
अंबवडे ग्रामस्थांना सार्वजनिक साहित्य वाटप…
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली वनपरिक्षेत्रातील अंबवडे (ता.जावली) येथील ग्रामस्थांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्या माध्यमातून वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रकारच्या सार्वजनिक साहित्याचे वाटप करण्यात आले.