शक्ती प्रदर्शनाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीकडून उदयनराजे भोसलेंचा उमेदवारी अर्ज दाखल – changbhalanews
राजकिय

शक्ती प्रदर्शनाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीकडून उदयनराजे भोसलेंचा उमेदवारी अर्ज दाखल

चांगभलं प्रतिनिधी | सातारा प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून आज गुरुवारी शक्ती प्रदर्शन करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार , पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह विविध आमदारांच्या उपस्थितीत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे दाखल केला.

सकाळी महागणपतीसह अन्य देवतांचे दर्शन घेतल्यानंतर फुलांनी सजवलेल्या बैलगाडीतून उदयनराजे अर्ज भरण्यासाठी निघाले. पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रथातून ढोल ताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. राजकीय पक्षांचे झेंडे कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले दिसत होते. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी , कार्यकर्ते , उपस्थित होते.

…. पिक्चर मतदाना दिवशी दिसेल!
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, रखरखत्या उन्हात उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला मोठा जनसमुदाय आपण पाहत आहात. हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर तर तुम्हाला मतदाना दिवशी दिसेल. या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार आमदार आहेत. अन्य दोन विधानसभा मतदारसंघात ही महायुतीची ताकद वाढली आहे. त्यामुळे 2019 पेक्षा आज वेगळी परिस्थिती असून त्यामुळे उदयनराजे हे प्रचंड मतांनी निवडून येतील. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असावेत असे आज प्रत्येकाला वाटते. तर राहुल गांधींना मॅच्युरिटीच नाही असे काँग्रेसचेच कार्यकर्ते सांगत असतात , अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. शरद पवार यांच्याकडून मतदार संघात चार सभा घेतल्या जाणार आहेत या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. घेऊ द्या. पण उमेदवार तर महायुतीचाच निवडून येईल.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयी होणाऱ्या 400 उमेदवारांमध्ये साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे.

गुरुवारी दाखल झाले सात उमेदवारी अर्ज…
आज (गुरूवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले, जलमंदिर पॅलेस सातारा यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून 3 नामनिर्देशनपत्र, आनंदा रमेश थोरवडे, रा. बुधवार पेठ, कराड जि. सातारा यांनी बहुजन समाज पार्टी पक्षाकडून 2 नामनिर्देशनपत्र तर शशिकांत जयवंरातव शिंदे, रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि, सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष, सयाजी गणपत वाघमारे, रा. तळबीड ता. कराड, जि. सातारा यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पक्षाकडून प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्रे दाखल केली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close