चांगभलं ऑनलाइन | मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्राचा कौल काय राहील, याबाबत दोन संस्थांचे निवडणूक पूर्व सर्व्हे नुकतेच समोर आले आहेत. वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात एकात महायुतीला तर दुसऱ्या सर्व्हेत महाविकास आघाडीला धक्का बसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असतानाच निवडणूक पूर्व सर्व्हे आणि त्यांचे आकडे सध्या चर्चेत आहेत.
नुकत्याच आलेल्या दोन सर्वेमधील टाईम्स नाऊच्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात लोकसभेला महायुती वरचढ ठरेल, असं भाकित वर्तवले गेले आहे तर सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, भाजपला धक्का बसेल आणि महाविकास आघाडीचा फायदा होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
48 जागा , 5 महिने, 5 सर्व्हे, त्यांच्याकडे असे आकडे…
– जुलै 2023 इंडिया टीव्ही सर्व्हे मध्ये महायुती 24 , मविआ 24,
– ऑगस्ट 2023 टाइम्स नाऊ सर्व्हे मध्ये महायुती 28 ते 32 , मविआ 15 ते 19.
– ऑक्टोबर 2023 इंडिया टीव्ही सर्व्हे महायुती 28, मविआ 20.
– डिसेंबर 2023 सी व्होटर सर्व्हे महायुती 19 ते 20, मविआ 26 ते 28.
– फेब्रुवारी 2024 टाइम्स नाऊ सर्व्हे महायुती 39, मविआ 9.
सव्वा महिन्यात कमालीचा फरक…..
शेवटचे दोन सर्वे हे दोन वेगवेगळ्या संस्थांनी केले असून डिसेंबर मध्ये झालेल्या सी व्होटर सर्वे मध्ये महायुतीला 20 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला तर अवघ्या सव्वा महिन्यात फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या टाइम्स नाऊ सर्वे मध्ये महायुतीला 39 जागा मिळण्याचे भाकित करण्यात आले आहे. म्हणजेच महायुतीला सव्वा महिन्यात 19 जागा वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या सी व्होटर मध्ये मविआ ला 26 ते 28 जागा मिळतील असे सांगण्यात आले होते. मात्र सव्वा महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये टाइम्स नाऊच्या सर्वे मध्ये 19 जागा घटण्याचा अंदाज वर्तवत मविआ ला केवळ 9 जागा मिळतील, असे भाकीत करण्यात आले आहे. काहीही असलं तरी शेवटी निवडणुका जवळ येतील तसं सर्वेचे आकडे, अंदाज बदलत चालले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीनंतरच यामधील कोणता अंदाज कितपत खरा ठरतोय हे समजू शकणार आहे.
निवडणूक सर्व्हेबाबत नेत्यांचं म्हणणं असं…
देशात मोदींचे वादळ सुरू, त्यामुळे महायुतीचा आकडा वाढणार..
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं वादळ सुरू आहे. त्यामुळे जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसा महायुतीचा आकडा आणखी वाढणार आहे.
ईव्हीएम, ओपिनियन पोल हा मोठा फ्रॉड…
शिवसेना नेते (उबआठआ) गट संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ईव्हीएम आणि ओपिनियन पोल हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. आधी ओपिनियन पोल येतो आणि नंतर ईव्हीएम सेट केलं जातं.
10 पैकी 7 लोक माहितीच्या विरोधात बोलतात…
महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, राज्यात दहा पैकी सात लोक हे महायुतीच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे महायुतीच्या बाजूने व्यक्त केलेला सर्वे हा चुकीचा छापला गेला असेल किंवा आकडे चुकले असतील. महायुतीला जास्तीत जास्त फक्त 18 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील, असे सर्व्हे सांगत आहेत.
लोकांनी मोदीजींनाच पंतप्रधान बनविण्याचे ठरवले आहे….
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, सर्वेचे आकडे काहीही येऊ दे, चांगले येऊ दे किंवा वाईट येऊ दे, पण लोकांनी नरेंद्र मोदीजींनाच पुन्हा पंतप्रधान बनवण्याचे ठरवले आहे. लोकांची मोदीजींच्या बरोबरच जाण्याची मानसिकता आहे, त्यामुळे मोदीजींच्या विचारांच्या उमेदवारांनाच जनता निवडून देईल.
दरम्यान, सर्वेचे वेगवेगळ्या संस्थांचे आकडे वेगवेगळे अंदाज वर्तवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापत निघाले आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झडू लागल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यात निवडणूक पूर्व राजकीय मेळावे, बैठकांना सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोप अन् वेगवेगळे दावे केले जात आहेत.
(टीप- या वृत्तामधील कोणत्याही सर्व्हेची चांगभलं समूह पुष्टी करत नाही)