चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. राज्यात गृह खाते आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अंतरवाली सराटी प्रकरणातही गृह खात्याचे फेल्युअर आहे, राज्यात गृहमंत्री पदाचा दर्जा घसरलेची स्थिती दिसत आहे, असा थेट निशाणा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खा. सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला. स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्या आज कराड येथे पत्रकारांशी बोलत होत्या.
खा. सुळे पुढे म्हणाल्या, माझ्यावर माझ्या कुटुंबाचे संस्कार झाले, त्यात यशवंतराव चव्हाणांचा मोठा वाटा आहे. संस्कार काय असतात आणि मराठी संस्कृती काय असते ते चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. आज महाराष्ट्रात २०० आमदारांचं सरकार आहे पण ते स्थिर नाही, त्यात महाराष्ट्राचे नुकसान आहे
महाराष्ट्रात आज सर्वात मोठं आव्हान दुष्काळ आणि पिण्याचे पाणी हे आहे. त्यामध्ये सरकार काही करताना दिसत नाही. ट्रिपल इंजिन सरकार विकासासाठी महाराष्ट्रात आलं पण आता विकास सोडून सगळं दिसतंय, असा टोला सुळे यांनी लगावला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला व्यवस्थित हाताळता आला नाही, असं स्पष्ट करून मराठा व इतर समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. त्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं तर चर्चेला आम्ही तयार आहोत, असंही खा. सुळे यांनी सांगितले.
पुण्यस्मरणानिमित्त स्व. चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन….
भारताचे माजी उपपंतप्रधान, नवं महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कराड येथील प्रीतीसंगम या समाधीस्थळी खा. सुप्रिया सुळे, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, देवराजदादा पाटील, मानसिंगराव जगदाळे, सारंग पाटील, संगीता साळुंखे (माई), नंदकुमार बटाणे, पोपटराव साळुंखे, गंगाधर जाधव, पांडुरंग चव्हाण तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, कराड नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक व इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.