कराडला ग्रामदैवत कृष्णामाई यात्रा महोत्सवाला पालखी मिरवणुकीने प्रारंभ
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कृष्णामाईच्या चैत्री यात्रा महोत्सवास आज (मंगळवार) पासून पालखी मिरवणुकीने प्रारंभ झाला. यात्रा सहा दिवस चालणार आहे. शनिवार (दि. २७) हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. प्रथेनुसार नित्य पूजाअर्चा, विधी व धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर आज सायंकाळी उशिरा श्रीकृष्ण दत्तात्रय आवटे (पुजारी) यांच्या निवासस्थानातून ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने कृष्णामाई यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला. सुवासिनींकडून पूजन झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली आणि कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील कृष्णा घाटावरील मंडपात पालखी येऊन विसावली.
दरम्यान, शहरातील नागरिकांनी व भाविकभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रतिवर्षाप्रमाणे मंडपात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यात्रा महोत्सवातील उर्वरित पाच दिवसात उद्या बुधवारी (दि. २४) सकाळी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री दिलीप गुरव यांच्या हस्ते ‘नवचंडी याग’ संपन्न होईल. दुपारी तीन वाजता भजन तर सायंकाळी सात वाजता ‘गीत रामायण’ कार्यक्रम पार पडणार आहे.
गुरुवारी (दि. २५) दुपारी ४ वाजलेपासून भजन, सायंकाळी ‘सुनहरी यादे’ कार्यक्रम, शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी ४ वाजता हळदी कुंकू, सायंकाळी भजन होणार आहे.
शनिवार (दि. २७) यात्रेचा मुख्य दिवस असून, सायंकाळी ४ वाजता भजन होणार आहे. रविवारी (दि. २८) सकाळी ढोल ताशांच्या गजरात कृष्णामाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. ही मिरवणूक मंडपात आल्यानंतर सायंकाळी लळीत कीर्तन, वसंतपूजा व रात्री येसूबाईच्या यात्रेने कृष्णामाई यात्रा महोत्सवाची सांगता होईल.
यात्रेनिमित्त जुने कृष्णाबाई सांस्कृतिक केंद्रात महाप्रसाद तर कृष्णाघाटावरील मंडपात बुंदी वाटप होणार आहे. तरी, भाविकांनी यात्रेतील कार्यक्रम व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णामाई उत्सव समितीचे अध्यक्ष आनंदराव पालकर यांनी केले आहे.