कराडला रोड रोमिओंची ‘वरात’ पोलीस ठाण्याच्या ‘दारात’…!
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
बदलापूर तेथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर कराड पोलिसांनी महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल (शुक्रवारी) सायंकाळी कराड जवळच्या ओगलेवाडी येथील आत्माराम शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड काढणाऱ्या व अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोड रोमिओंना कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व निर्भया पथक यांनी चांगलाच धडा शिकवला. उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी स्वतः कारवाईत सहभागी होत तेथील टवाळ खोरी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे शैक्षणिक वर्तुळातून व कराड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.
बदलापूर येथील शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात सर्वत्रच पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीकक्षक समीर शेख यांनी जिल्हा पोलीस दलाला जिल्ह्यातील मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. महिला अत्याचाराच्या घटना , छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे त्यांनी आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व व निर्भया पथकाने कराड परिसरात कारवाईचा ‘ॲक्शन प्लॅन’ सुरू केला आहे.
काल (शुक्रवारी) सायंकाळी ओगलेवाडी येथील आत्माराम शाळेच्या परिसरात छेडछाड व अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोड रोमियोंना ताब्यात घेत त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये पोलिसांनी कारवाई केली. निर्भया पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यासह स्वतः पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी रस्त्यावर उतरून ही कारवाई केली. पोलिसांच्या अचानक कारवाईने अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. ही कारवाई करून या परिसरातील रोड रोमिओंना पोलिसांनी चांगलाच दणका दिला.
कॅफे चालकावर कारवाई….
या कारवाई दरम्यान ओगलेवाडी परिसरातील एका कॅफेची तपासणी करून नियमबाह्यबाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित कॅफे चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर देखील महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे कारवाई केली. या कारवाईने या परिसरातील हॉटेल व लॉज व्यावसायिक, कॅफे चालक त्यांचे धाबे दणाणले आहेत.
शाळा- महाविद्यालयांच्या परिसरात साध्या वेशातील पोलिसांची गस्त…
कराड मधील विद्यानगर, सैदापूर, मलकापूर येथे शैक्षणिक संकुले आहेत. या शाळा – महाविद्यालयांच्या परिसरात फाळकुट दादांची सतत अरेरावी सुरू असते. शिक्षणासाठी बाहेरगावहून येणाऱ्या मुला-मुलींना धमकवण्याच्या घटना घडतात. अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांची आणि मुलींच्या जवळून भरधाव दुचाकी चालवत ‘हवा’ करणाऱ्या रोड रोमिओंची ‘हवा’ काढण्याचे नियोजन पोलिसांनी केली आहे. त्यासाठी आता कराड परिसरातील सर्वच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कचाट्यात सापडल्यास रोड रोमिओंना पोलिसी खाक्या बघायला मिळणार आहे
शाळा व कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिला आहे. शालेय मुली व महिलांनी त्यांना कोणाचा त्रास होत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे. पालकांच्या मार्फतही पोलिसांना कळवता येईल. अशी कोणतीही तक्रार आल्यास पोलीस कोणाचाही मुलाहिजा न ठेवता तात्काळ कारवाई करतील, असा इशारा उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिला आहे.