कराडला 25 व 26 फेब्रुवारीला ग्रंथोत्सव व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीमध्ये वाढ व्हावी व ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी तसेच प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रिसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी हा उद्देश ठेवून रविवार दिनांक 25 व सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन , टाऊन हॉलमध्ये ग्रंथोत्सव आयोजन करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवामध्ये जिल्हयातील ३३६ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी, सातारा शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, राज्यातील शासकीय मुद्रणालये, प्रकाशक व ग्रंथ विक्रेते यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे., अशी माहिती सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंगोले म्हणाल्या, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा या कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव अंतर्गत ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवी संमेलन, लेखक व वाचक संवाद, ग्रंथ प्रदर्शन व विक्री इ. साहित्यिक कार्यक्रम दिनांक २५ व २६ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन रविवारी सकाळी 10 वाजता ना. शंभूराज देसाई, मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा यांच्या शुभहस्ते व खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राज्यसभा सदस्य, यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
रविवारी सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर ग्रंथदिंडीचा मार्ग कराड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, टाऊन हॉल-विजय दिवस चौक-कर्मवीर भाऊराव पाटील चौक-दत्त चौक-यशवंत हायस्कूल चौक-उपविभागीय दिवाणी न्यायालय-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक उपजिल्हा रुग्णालयापासून कार्यक्रम स्थळी शहरातील या मार्गे याप्रमाणे आहे. तसेच रविवार, दि.२५ फेब्रुवारी, २०२४पहिले सत्र (दुपारी २.०० वा.) ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ या विषयावर होणार असून सहभागी वक्ते : प्राचार्य विनोद बाबर, शिवचरित्राचे अभ्यासक, संजय इंगवले, ग्रंथपाल, नागोजीराव पाटणकर स्मारक ग्रंथालय पाटण, प्रमुख उपस्थिती विनोद कुलकर्णी, प्रतिनिधी, महाराष्ट्र साहित्य परिषद, जिल्हा सातारा, श्रीमती सुनिताराजे पवार, अध्यक्ष, जिल्हा प्रकाशक संघटना यांची राहणार आहे. दुसरे सत्र (सायंकाळी ४.०० वा.) ‘महाचर्चा : वाचनसंस्कृती आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर होणार आहे. त्यासाठी अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे, ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक, तर प्रमुख उपस्थिती अॅड. संभाजीराव मोहिते, मेडिएटर, उच्च न्यायालय, मुंबई यांची असून सहभागी वक्ते सौरभ पाटील, विजय माळी, अरुण काकडे, दादाराम साळुंखे हे असणार आहेत.
दुसरा दिवस, दि. 26 फेब्रुवारी 2024 पहिले सत्र सकाळी 11 वाजता ‘ रंग प्रतिभेचा’ कवि संमेलनाने होणार आहे.
अध्यक्ष : शाहिर थळेंद्र लोखंडे असून सहभागी कवी : विजया पाटील प्रमोद सुकरे, उध्दव पाटील, संध्या पाटील, ज. तु. गार्डे, शरद पाटील, दादा सावंत, उन्मेष पाटील, संजय शेवाळे, चंद्रशेखर खेतमर, शीतल खेतमर, सुनिता पाटील आहेत . दुसरे सत्र (दुपारी २.०० वा.) ‘ मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर होणार असून त्यामध्ये शालेय विद्यार्थी: कु. ईश्वरी मंगेश सुर्यवंशी , कु. समृध्दी विजय ससाणे, कु. सृष्टी कुंभार , कु. अवनी सावंत, कु. श्रध्दा चव्हाण, कु. आदिबा तांबोळी यांचा सहभाग आहे. ग्रंथोत्सव समारोप (सायंकाळी ४.०० वा.) विषय- ‘स्पर्धा परिक्षा व मुलाखतीची तयारी’ या विषयाने होत असून अध्यक्षस्थानी : जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती वर्षा पाटोळे आहेत तर सहभागी वक्ते – प्रा. बी. एस. खोत, संचालक, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे स्पर्धा मार्गदर्शन केंद्र कराड, जीवन पवार, (संचालक, UPSC / MPSC स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, कराड ) हे असणार आहेत. अशा विविध साहित्यिक कार्यक्रमांसोबतच शासकीय व बालभारती प्रकाशने, स्पर्धा परीक्षेचे ग्रंथस्टॉल आणि अन्य प्रकाशनांचे ग्रंथ प्रदर्शनासाठी व विक्रीकरिता उपलब्ध असणार आहेत.
तरि ग्रंथ, साहित्यिक व वाचक यांच्या आनंददायी व ज्ञानवर्धक मेळाव्यात जिल्हयातील अधिकाधिक ग्रंथप्रेमी व वाचकांनी सहभागी होऊन या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती शालिनी गो. इंगोले, प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव, ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समिती, सातारा यांनी केले आहे.