बदलापूर घटने प्रकरणी शाळा व शाळेचे संबंधितांची चौकशी सुरू ; दोषींवर कारवाई करणार ; मंत्री दीपक केसरकर – changbhalanews
Uncategorized

बदलापूर घटने प्रकरणी शाळा व शाळेचे संबंधितांची चौकशी सुरू ; दोषींवर कारवाई करणार ; मंत्री दीपक केसरकर

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
बदलापूर येथे शालेय अल्पवयीन मुलींच्या बाबतीत झालेली घटना अत्यंत दुर्देवी घटना असून ही घटना ज्या शाळेत घडली आहे त्या शाळेची आणि शाळेशी संबंधितांची चौकशी शिक्षण विभागाचे उपसंचालक व बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष करीत आहेत. त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

श्री.केसरकर यांनी बदलापूर येथे जाऊन या घटनेबाबत सविस्तर माहिती घेऊन चौकशी केली. त्यानंतर मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

श्री.केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांचे हित हेच माझे अंतिम ध्येय आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर झालेला अत्याचार सहन केला जाणार नाही. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून डॉक्टर, पोलीस यांच्याकडून दिरंगाई झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही संबंधित विभागांमार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उद्या बुधवारी सायंकाळी 4 वाजता पालकांना भेटायला पुन्हा बदलापूर येथे जाणार असल्याचे सांगून त्यावेळी पालकांनी आपले म्हणणे कळवावे, त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल, असेही श्री.केसरकर यांनी सांगितले. पीडितांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

“सखी सावित्री” समितीची स्थापना न करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘सखी सावित्री’ समिती स्थापन करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. 82 हजार शाळांमध्ये अशी समिती नेमण्यात आली असून ज्या शाळांमध्ये अशी समिती अद्याप नेमण्यात आली नाही, त्यांची चौकशी करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. लहान विद्यार्थिनींना अडचणीच्या प्रसंगी मोठ्या विद्यार्थिनींशी संवाद साधता यावा या दृष्टीने शाळांमध्ये देखील विशाखा समिती स्थापन करण्यात येईल. या व्यतिरिक्त विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये ठराविक कालावधीनंतर बदल करणे, किमान चौथीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थिनींसाठी महिला कर्मचारी नियुक्त करणे, परिसरात पुरेसा प्रकाश राहील अशी व्यवस्था करणे, अलार्म बेल ची सुविधा उपलब्ध करणे, स्वच्छतागृहांची देखभाल महिला कर्मचाऱ्यांमार्फत करणे, विद्यार्थिनींमध्ये लैंगिक संवेदनशीलतेबाबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागृती निर्माण करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, सुरक्षितता आदी बाबींच्या दृष्टीने सर्व शाळा शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाशी जोडल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close