डोंगरदऱ्यांतील मेंढपाळांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर ही धनगर समाजासह इतर वंचित घटक शिक्षणापासून वंचित : प्रवीण काकडे

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षाचा काळ गेला तरी आजही डोंगरदऱ्या खोऱ्यातील धनगर समाज व इतर उपेक्षित गोरगरीब समाज बांधव शिक्षणापासून वंचित आहेत, असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले.
मालदेव जि. सातारा येथे व मोरबाग, पळसावडे, ठोसेघर येथे 140 विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्यावतीने घरपोच शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा माजी पंचायत समिती सदस्य शंकराप्पा चव्हाण हे होते.
काकडे म्हणाले की, पोटाची खळगी भरण्यासाठी समाजाची दरऱ्या खोऱ्यात वणवण भटकंती आजही सुरू आहे. आज ही सर्वांना कोणत्याही प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. रस्ता, पाणी, आरोग्य, शाळा या सुविधांपासून समाज वंचित राहिलेला आहे. पाच ते सहा किलोमीटरच्या पुढे सर्व विद्यार्थ्यांना पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागते. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या भीतीपोटी समाजबांधव आजही गांगरून गेला आहे. डोंगरदऱ्या खोऱ्यातील समाज बांधव अंधारात चाचपडत आहे. त्यांना प्रकाशाकडे नेण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण गेली अनेक वर्षे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचेवतीने सातारा, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या सात जिल्ह्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील समाज बांधव, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
याप्रसंगी शाळेच्या दोन खिडक्या मोडकळीस आलेल्या होत्या त्या नवीन बसवण्यासाठी मालदेवकर यांनी प्रवीण काकडे व शंकराप्पा चव्हाण यांच्या शुभहस्ते मुख्याध्यापक जाधव सर यांच्याकडे खर्चासाठी निधी सुपूर्द केला. शंकरआप्पा चव्हाण व उपसरपंच जयराम चव्हाण, शंकर बेडेकर यांची भाषणे झाली कार्यक्रमासाठी आनंदराव कचरे रायगड जिल्हा अध्यक्ष, सतीश थोरात कराड तालुका अध्यक्ष, रामभाऊ कोकरे, बाबुराव खरात, शंकर शेडगे, रामचंद्र खरात, लक्ष्मण खरात, लक्ष्मण मेळाट, विठ्ठल मेळाट , विठ्ठल खरात, सारिका कोकरे, नामदेव अवकिरकर, सरपंच चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेल्स टॅक्स अधिकारी आनंदराव खरात यांनी केले व आभार ग्रामपंचायत सदस्य कोंडीबा पांढरमिसे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.