बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम दाखवायचे असेल तर ‘हे’ करा
अभिजीत बिचुकले यांची मुख्यमंत्र्यांना 'जनतेच्यावतीने विशेष सूचना'

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम दाखवायचे असेल तर त्यांच्या 17 नोव्हेंबर या पुण्यतिथीच्या अनुषंगाने 500 रुपयात घरगुती गॅस सिलेंडरची घोषणा करा, अशी मागणी कवी मनाचे नेते अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसे पत्रच या कवी मनाच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांना धाडले आहे.
अभिजीत वामनराव आवाडे – बिचुकले यांच्या लेटरहेड पत्रावर ‘कवी मनाचे नेते’ आणि ‘छत्रपती शिवरायांचे वैचारिक वारस’ अशी त्यांनी स्वतःची ओळख नमूद केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात अभिजीत बिचुकले यांनी म्हटले आहे की, छत्तीसगड येथील जनतेला ५०० रुपयामध्ये गॅस सिलेंडर या भाजपाच्या आश्वासनानुसार ताबडतोब महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर या पुण्यतिथी दिनाच्या अनुषंगाने ५०० रुपयामध्ये गॅस सिलेंडर मिळणेकामी “स्व. बाळासाहेब ठाकरे ५०० रुपयामध्ये गॅस सिलेंडर योजना” महाराष्ट्रामध्ये सुरू करावी व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आपले प्रेम दाखवावे.” ही मागणी न म्हणता त्यांनी ही ‘विशेष सुचना ‘ असं पत्रात म्हटलंय.
विस्ताराने लिहिताना अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं आहे की, ” सर, महाराष्ट्रातील जनतेने २०१४ पासुन भाजपाला सत्तेमध्ये येण्यास मतदान केले आहे. आपण शिवसेना पक्ष फोडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सत्तेमध्ये आज मुख्यमंत्री आहात. आपणास मुख्यमंत्री करणारा पक्ष भाजपा छत्तीसगड येथील जनतेला ५०० रूपयामध्ये गॅस सिलेंडर देण्याचे आश्वासन देत आहे. असे असेल तर महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला सत्ता दिली असल्याने आपण भाजपाच्या माध्यमातुन येथील जनतेला ताबडतोब ५०० रूपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याची घोषणा करावी. व विशेष म्हणजे ५०० रूपयामध्ये गॅस सिलेंडरच्या योजनेला तुमचे आदर्श ‘स्व. बाळासाहेब ठाकरे ५०० रूपयामध्ये गॅस सिलेंडर योजना’ असे नाव द्यावे. अशी महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने ही विशेष सूचना करीत आहे. तरी ती तात्काळ मान्य करुन तशी घोषणा करावी व भाजपाकडून जनतेला दिवाळीची भेट द्यावी.”, असं बिचुकले यांनी म्हटलं असून पत्राच्या शेवटी त्यांनी मुख्यमंत्र्यांना “दिपावलीच्या शुभेच्छा !” दिल्या आहेत.
खरंच! मागणी विचार करायला लावणारी…
अभिजीत आवाडे-बिचुकले हे त्यांच्या तिरकस ‘डायलॉगसाठी’ फेमस आहेत. महाराष्ट्रात ते सेलिब्रेटी म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही अनेक घटनावर त्यांनी ज्या त्यावेळी आपला ‘आवाज’ उठवला आहे. आता तर त्यांनी स्वयंपाक घरातील महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय हाती घेतला असून घरगुती गॅस सिलेंडर वरून मुख्यमंत्र्यांना ‘विशेष सूचित’ केले आहे. बरं ही विशेष सूचना आपण जनतेच्या वतीने करत असल्याचेही त्यांनी पत्रात सांगितलं आहे. तसं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या सातारा जिल्ह्यातले आहेत, अभिजीत आवडे बिचुकले हेही त्याच साताऱ्याचे आहेत. सातारा-सातारा असं हे कनेक्शन असल्यामुळे या कवी मनाच्या नेत्याच्या मागणीची दखल मुख्यमंत्री जरूर घेतील आणि लवकरच महाराष्ट्रातील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 500 रुपयांपर्यंत खाली येईल, अशी आशा बाळगायला काय हरकत आहे!