शरद पवारांनी निर्णय घेतला तर साताऱ्यातून हाताच्या चिन्हावर लढण्यास तयार – पृथ्वीराज चव्हाण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून इंडिया आघाडी आणि महायुतीकडूनही अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच सातारा जिल्ह्यात महायुतीच्या सक्षम उमेदवाराला तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी इंडिया आघाडीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणामुळे उमेदवारीसाठी नकार दिल्याने तुल्यबळ उमेदवाराची शोधाशोध इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. कालच (रविवारी ) राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कराडमध्ये सुमारे तासभर कमरा बंद चर्चा केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून ठेवण्यात आला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांच्यामध्ये सुरू होती. मात्र आता दस्तर खुद्द आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीच शरद पवारांनी असा निर्णय घेतला तर हाताच्या चिन्हावर आपण सातारा लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे अधिकृतपणे सातारा येथे एका डिजीटल वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा बालेकिल्ला समजला जातो. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे विजयी झाले होते. त्यांनी महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांना पराभूत केले होते. मात्र प्रकृतीचे कारण पुढे करत श्रीनिवास पाटील यांनी यावेळी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे साताऱ्याची लोकसभेची जागा असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवाराची चाचपणी गेल्या काही दिवसापासून सुरू केली आहे.
सातारा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शरद पवार यांनी उमेदवारीबाबत कानोसा घेण्याचा प्रयत्न केला , त्यामध्ये श्रीनिवास पाटील यांच्यासह आमदार बाळासाहेब पाटील सत्यजितसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे आणि स्वतः शरद पवार अशी काही नावे कार्यकर्त्यांच्याकडून पुढे आली. मात्र श्रीनिवास पाटील यांनी नकार दर्शविलेला आहे तर इंडिया आघाडीच्या प्रचारसभांची जबाबदारी असल्याने तसेच देशभरात प्रचार सभांना फिरावे लागणार असल्याने आपण उमेदवारी करणार नाही असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या बैठकीनंतर या जागेचा अंतिम निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर काल रविवारी कराड येथे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सुमारे तासभर कमरा बंद चर्चा केली. यावेळी सातारा लोकसभेची जागा ही पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिया आघाडीतून लढवावी असा प्रस्ताव जयंत पाटील यांनी ठेवला असल्याचे कार्यकर्त्यांच्यातून बोलले जात होते. मात्र यावर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कोणीही थेट भाष्य करण्याचे टाळले होते. आज मात्र सातारा येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी एका डिजिटल वृत्तवाहिनीशी बोलताना यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सातारा लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जागा आहे. ही यशवंत विचारांची कर्मभूमी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात जातीयवादी पक्षाचा उमेदवार निवडून येता कामा नये अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी सर्व काही करण्याची तयारी आम्ही सुरू ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. शरद पवार यांनी साताऱ्याच्या जागेचा निर्णय घ्यायचा आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यांनी जर मला लढण्यास सांगितले तर हाताच्या चिन्हावर लढण्याची माझी तयारी आहे. ”
पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगणार?
सातारा लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र उदयनराजेंना महायुतीने उमेदवारी जाहीर केल्यास पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगेल. त्यामध्ये इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष , विशेषता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील मातब्बर नेते सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचे एकदिलाने काम करणार का ? याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे.