मी मतदान केले, तुम्हीही करा…!
२६०, कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांचे मतदारांना आवाहन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
लोकशाहीच्या उत्सवांतर्गत विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्यातील 288 जागांसाठी बुधवार (ता.२०) रोजी मतदान होत आहे. मतदान करणे हा आपला मूलभूत अधिकार आहे, व तो बजावणे ही एक जबाबदारी आहे असे सांगत मी मतदान केले, तुम्हीही करा…! असे आवाहन २६०, कराड दक्षिण मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मतदारांना केले आहे.
आज सोमवारी (दि.१८) रोजी श्री शिवाजी विद्यालय कराड येथे प्रांत अतुल म्हेत्रे यांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद आपल्या बोटात आहे. त्यामुळे ती संधी कुणीही गमावू नका. जास्तीत जास्त मतदान व्हावे, म्हणून निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. कराडमध्ये आम्ही स्वीप पथकाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकप्राप्त खेळाडूची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करून शहरातून रॅलीच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली. तसेच शाळा, महाविद्यालयांच्या सहकार्याने गावोगावी प्रभात फेरी, सायकल फेरी, सेल्फी पॉइंट, विद्यार्थ्यांनी चित्राद्वारे, अभिनेत्यांच्या नकला करत रिल्स तयार करून, कविता, उखाण्यांच्या माध्यमातून व निवडणूक विभागाच्या प्रशासकीय इमारती समोर आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून आणि मानवी साखळीतून महाराष्ट्र साकारत १०० % मतदानाचे आवाहन करून जनजागृती केली. लहानग्या मुलांनी तर आई-बाबा आमचा एवढाच हट्ट पुरा करा, आमच्या भविष्यासाठी मतदान नक्की करा असा संदेश देत मतदान वाढीसाठी प्रयत्न केले आहेत.
याशिवाय मतदारांना मुक्तपणे मतदान करता यावे, म्हणून राज्य सरकारने आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांनीच शंभर टक्के मतदानासाठी पुढाकार घ्यावा असेही आवाहन शेवटी त्यांनी केले.