कराडात न्यू उदय कला ग्रुपच्यावतीने कार सेवकांचा सन्मान
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून येथील मुळीक गल्लीतील न्यू उदय कला ग्रुपच्या वतीने कराड शहरातील कार सेवकांचा शाल श्रीफळ व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कारसेवकांनी अयोध्येत उभे राहिलेले प्रभू श्रीरामाचे मंदिर म्हणजे आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या स्वप्नपूतचा सोहळा असल्याचे सांगत त्यांनी कारसेवेच्या आठवणींना उजाळा दिला.
अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाच्या आगमनाने संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेचा हा जल्लोष कराड शहरातही साजरा करण्यात आला. येथील मुळीक गल्लीतील न्यू उदय कला ग्रुपच्यावतीने अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहण्यासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या कारसेवकांचा जनकल्याण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कराड तालुकाप्रमुख तुकाराम चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कारसेवक अशोक सुर्यवंशी, सुधीर शिंदे, गणेश शिंदे, प्रशांत तवर, सुनिल पावसकर, समीर करमरकर, नितीन सुर्वे, नागेश कुलकण, श्रीकांत शेणेकर, दत्तात्रय कार्वेकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अनेक कार सेवकांनी 1992 मधील ‘त्या’ आठवणींना उजाळा देत आजचा सोहळा आमच्या आयुष्यातील स्वप्नपूतचा सोहळा असल्याचे सांगितले. सन 1992 साली सर्वात मोठा संघर्ष झाला. हजारो कारसेवक व हिंदुत्ववादी स्वयंसेवकांनी जीवाची परवा न करता धर्माच्या अस्मितेवर लागलेला कलंक पुसण्यासाठी व वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलत संबंधित ढाचा पाडला. त्यावेळी शेकडो कारसेवकांचा मृत्यू झाला. अनेकांना शरयू नदीने पोटात सामावून घेतले. कारसेवकांच्या बलिदानामुळे आज खऱ्या अर्थाने अयोध्या नगरी सजली असल्याचे गौरवोद्गार यावेळी कारसेवकांनी आपल्या आठवणीतून काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सचिन मोहिते यांनी केले. यावेळी न्यू उदय कला ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.