कराडच्या कार्वे नाक्यावर युवकाचा निर्घृण खून
हल्लेखोराचे पलायन : घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
शहरातील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याचा निर्घृण खून झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोराने पलायन केले असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. शुभम रविंद्र चव्हाण (वय २२, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शहरातील कार्वे नाका येथील चौकात शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शुभम चव्हाण याच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने सपासप वार केले. शुभम रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी शुभमला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची बॅरिगेट लावले. घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पाटणे पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक राजू डांगे यांनी भेट दिली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हल्लेखोराच्या शोधासाठी पथके रवाना…
या घटनेची नोंद सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती. तसे ठाणे अंमलदार यांच्याकडून पत्रकारांना सांगण्यात आले. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांच्याकडे असल्याचे ठाणे अंमलदार यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे या घटनेचा अधिकचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान, हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
घटनास्थळी रक्ताचे डाग….
कार्वे नाका चौकात जेथे घटना घडली त्या ठिकाणी रक्ताचे डाग जमिनीवर पडले असल्याचे दिसत होते. या परिसराच्या सभोवती पोलिसांनी बॅरिगेट लावून बंदोबस्त तैनात केला होता.