दुग्ध व्यवसायातील संधी आणि धान्य प्रक्रिया उद्योगाबाबत तज्ञांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आपल्याकडे अजूनही दुग्ध व्यवसायाकडे पारंपारिक उद्योग म्हणूनच पाहिले जाते. परंतु, या व्यवसायातून दुधाव्यतिरिक्त खत, निरोगी कालवडींचे संगोपन, कुक्कुटपालन, ओला चारा निर्मिती, मुरघास आदींच्या माध्यमातूनही चांगले उत्पन्न मिळवता येते. यासाठी शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर गोविंद डेअरी, फलटण संस्थेचे संचालक डॉ. शांताराम गायकवाड यांनी केले. येथील कृष्णा कृषी परिषदेतर्फे आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवामध्ये कृषी चर्चासत्रात ‘दुग्ध व्यवसायातील नवीन संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. गायकवाड म्हणाले, आपल्याकडे लोक पंजाब, हरियाना, कर्नाटक इत्यादी राज्यांतून गाय व म्हैशी विकत आणतात. त्याठिकाणी ही जनावरे चांगले दुध देतात. पण आपल्याकडे आणल्यावर बऱ्याच वेळा तक्रारी वाढतात. त्यापेक्षा आपल्या तरुणांनी चांगल्या प्रकारे वासरांचे संगोपन केल्यास या माध्यमातून त्यांना मोठी रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. गावातला पैसा गावात राहिला पाहिजे. व्यवसाय करताना भांडवल, कमी खर्चातून जास्त उत्पादन, मजूर पुरवठा, जनावरांची चांगली वंशावळ, बाजारपेठ आणि जनावरांना होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध या गोष्टी महत्वपूर्ण आहेत. जनावरांना चांगला चारा दिल्यास खाद्याचा खर्च 50 टक्क्यांपेक्षा कमी करता येतो. व्यवसायिक दृष्टीने दुग्ध व्यवसाय व चारा व्यवस्थापन करता आले पाहिजे. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची खाज धरली, तर दुग्ध व्यवसाय उत्कृष्ट पद्धतीने करता येऊ शकतो.
दुसऱ्या सत्रात ‘तृणधान्य प्रक्रिया उद्योग’ विषयावर मार्गदर्शन करताना सौ. उमा मांगले म्हणाल्या, तृणधान्य हा मानवी आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्याकडे विविध प्रदेशात ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, भगर आदींचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे नाचणी उद्योगातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. परंतु, नाचणी सत्वाकडे फक्त लहान मुलांचा पोषक आहार म्हणूनच पहिले जाते. मात्र, नाचणी ही सर्व वयोगटासाठी फायदेशीर असून त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती व हिमोग्लोबिनही वाढते. महिला बचत गटांच्या माध्यमातून नाचणीची विविध उत्पादने मोठ्या प्रमाणावर बनवली जात असून त्याला चांगली बाजारपेठही मिळत आहे. त्यामुळे महिला, युवती आणि तरुणांनीही अशा प्रकारच्या उद्योगाकडे वळायला हवे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.