पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘या’ व्यक्ती आणि संस्थांचा हरित सातारा तर्फे झाला गौरव
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
डांबरी रस्ता चालत असेल तर सिमेंट रस्त्याचा हट्ट का? विकास पहात असताना तो शाश्वत कसा होईल याचा विचार करा. इकॉनॉमी पेक्षा इकॉलॉजी जास्त महत्त्वाची आहे, असे विचार राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी मांडले.
पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व त्यामध्ये सातत्य राखणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा हरित सातारा ग्रुप तर्फे गौरव करण्यात आला. राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (निवृत्त) सुनील लिमये व सातारा -जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. सातारा क्लब च्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात श्री. लिमये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात साध्या साध्या गोष्टींमधून आपण पर्यावरण रक्षणाचे काम करू शकतो. विजेचा गरजेपुरता वापर, वातानुकूलित यंत्रणेचा मर्यादित वापर, पाण्याची नासाडी टाळणे, प्लास्टिकला जीवनातून हद्दपार करणे यासारख्या गोष्टी केल्या तरी मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला आळा घालता येऊ शकेल. प्रत्येक मनुष्याचे आयुष्य 75 वर्षे गृहीत धरल्यास एक व्यक्ती आयुष्यभरात जेवढा कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जित करेल तो शोषून घेण्यासाठी 15 झाडे पुरेशी आहेत. प्रत्येक माणसाने 15 झाडे लावून त्याचे संगोपन केल्यास कार्बन कमी करण्यास मोठा हातभार लागेल.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पर्यावरण आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकास तर झाला पाहिजे तो थांबवता येणार नाही. मात्र हे करत असताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रत्येकाला घ्यावी लागेल. नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर थोडीफार कृती केल्यास निसर्ग संपन्न सातारा हे ब्रीद आपण कायम राखू शकू.
या व्यक्ती आणि संस्थांचा झाला सन्मान….
भैरवनाथ डोंगर ग्रुप लोणंद, जि.सातारा, डॉ. चंद्रकांत शेटे व समस्त जैतापूर (ता. सातारा) ग्रामस्थ, कुर्णेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुप सातारा, कराडचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, चंद्रकांत सणस व जकातवाडी ग्रामस्थ, दुर्गनाद प्रतिष्ठान परळी, नाना खामकर, कराड, वसंत पाटील & असोसिएटस् चे संचालक दीपक पाटील, कुणबी समाज संघ सातारा, संग्राम बर्गे मित्र समूह, अजिंक्यतारा निसर्ग मित्र ग्रुप, जयवंतदादा ट्रेकर ग्रुप, मैत्री पार्क विसावा नाका, दैनिक लोकमत, सातारा नगर पालिका, वेद अॅकॅडमी सातारा, शाहूपुरी प्राईड फाऊंडेशन व राजे करिअर अॅकॅडमी यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
व्यासपीठावर हरित साताराचे भालचंद्र गोताड उमेश खंडूजोडे, प्रगती जाधव पाटील तसेच कन्हैयालाल राजपुरोहित माजी नगरसेविका सुवर्ण पाटील माजी नगरसेवक जयवंत भोसले पुणे सीआयडी चे अतिरिक्त अधीक्षक विजय शेळके, डॉ. शेखर घोरपडे, डॉ. चंद्रकांत शेटे, साताऱ्याची मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, ड्रोन्गोचे अध्यक्ष सुधीर सुकाळे तसेच साताऱ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हा तीन दशकांच्या कार्याचा सन्मान…
हरित सातारा तर्फे पश्चिम महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांच्या माझ्या व नाना खामकर यांच्या निसर्ग संवर्धन पर्यावरणवादी कार्याबद्दल आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व सुनील लिमये महाराष्ट्र राज्य निवृत्त प्रधान मुख्य वनंरक्षक (वन्यजीव) यांनी केलेला सन्मान अविस्मरणीय असा आहे.
:- रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक