स्वाभिमानी नेत्याला साथ देऊन जातीयवाद्यांना कडवे उत्तर द्या – खा. सचिन पायलट – changbhalanews
राजकिय

स्वाभिमानी नेत्याला साथ देऊन जातीयवाद्यांना कडवे उत्तर द्या – खा. सचिन पायलट

कराडच्या शिवतीर्थ दत्त चौकात आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराची सांगता सभा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
भाजप व महायुतीच्या सरकारमध्ये पदासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे ते आपला विकास काय करणार? हे जनतेच्याही लक्षात आले आहे.‌ पृथ्वीराजबाबा म्हणजे राजकारणातील सुसंस्कृत , सभ्य आणि अंगावर कोणताही डाग नसणारा असा नेता आहे. हा तुमचा नेता आहे , याचा अभिमान बाळगा. आणि या स्वाभिमानी नेत्याला साथ देऊन जातिवाद्यांना कडवे उत्तर द्या, असे आवाहन खा. सचिन पायलट यांनी कराड येथील शिवतीर्थ दत्त चौकात झालेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत केले. ही सभा रविवारी, दि. 17 नोव्हेंबर रोजी रात्री झाली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश नहाटा, कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पोपटराव साळुंखे, माजी नगरसेवक अरुण जाधव, माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले, अल्ताफ शिकलगार, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील, कराड तालुका शिवसेना प्रमुख नितीन काशीद, जयेश मोहिते, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, फारूक पटवेकर, मझहर कागदी, रमेश वायदंडे आदी मंचावर उपस्थित होते.

खा. पायलट म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला काँग्रेसच्या विचारांची परंपरा आहे. इथल्या जनतेने नेहमीच काँग्रेसला विजयी केले आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या आई, वडिलांनी या मतदारसंघातील जनतेची सेवा केली आहे, हे आपण विसरता कामा नये. या निवडणुकीत मतदारांना खूप अमिष दाखवली जात आहेत. मात्र कराड दक्षिणमधील जनता हाताच्या पंजालाच निवडून देईल. राज्यातील जनतेने भाजपला लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला. त्यामुळे केंद्रातील सरकारला दुसऱ्यांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत.

महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यावर आज कोणीही बोलत नाही तर याउलट जातीयवादी नेते बटेंगे – कटेंगे अशी भाषा वापरत आहेत. पण त्याच्या विरोधात आपण पढोगे तो बढोगे अशी घोषणा दिली पाहिजे. स्वातंत्र्यासाठी बलिदानाची काँग्रेसला परंपरा आहे. पण स्वातंत्र्यलढ्यात ज्यांना साधे खरचटले नाही. ते राजकीय स्वार्थासाठी सतत जातीभेद करण्याची भाषा करत आहेत. खुर्ची धोक्यात आली की धर्माचा मुद्दा पुढे करत आहेत.

महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेलाच भाजपला नापास केले विधानसभेत हाच ट्रेंड कायम राहील, असे सांगून उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना नागपूरला दोन मोठे उद्योग आणले. ते या मंडळीनी सुरू केले नाहीत. कराडचे मी आणलेले भूकंप संशोधन केंद्र हे जगातील दुसरे भूकंप संशोधन केंद्र आहे, हे लक्षात घ्या. अशी अनेक विकासकामे करून कराडला जिल्हा पातळीवरचे शहर म्हणून विकसित करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मात्र काहींना हा विकास दिसत नाही.

तुम्हा कराडकरांच्या आशीर्वादामुळेच मला राजकीय उंची गाठता आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कराडच्या सभेत मला आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेता असे म्हटले. त्यांची भाषा टीकात्मक होती, तरीही मी स्वागत करतो. मात्र हे नक्की की मी सडक छाप राजकारणी नक्कीच नाही. आम्ही नेहमीच यशवंतराव चव्हाण यांची शिकवण अंगीकारली आहे. पी. डी. पाटील यांनी कराडची जडणघडण केली. विलासकाकांनीही या मतदारसंघाची उंची वाढवली. याची जाणीव मतदार संघातील जनतेला आहे. त्यामुळे जनतेने कधीही जातीयवादी लोकांना थारा दिलेला नाही.

ते पुढे म्हणाले, विकासकामे व प्रकल्प आणणे हे लाईट वेट नेत्यांचे काम नाही, त्यासाठी राजकीय वजन असलेला नेताच लागतो. हे सर्व विरोधी उमेदवाराकडे आहे का? कराड दक्षिणमध्ये वेगळी संस्कृती रुजविण्याचा काहींचा प्रयत्न आहे मात्र कराडचे राजकारण तुम्हाला आम्हाला बिघडू द्यायचे नाही. तुमच्या आशीर्वादातून मी उतराई होवू शकत नाही. इतके ऋण तुमचे माझ्यावर आहेत, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचा विचार जपला आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्याला तोड नाही. या विचाराला तुम्ही साथ द्यावी. राज्यात सत्ता परिवर्तन घडेल, अशी परिस्थिती आहे.

माजी आ. रामहरी रुपनवर म्हणाले, महायुती सत्तेवर आली तेंव्हा राज्यावर अडीच लाख कोटी कर्ज होते. आता ते साडेनऊ लाख कोटी झाले आहे. हे कर्ज तुमच्या आमच्या सर्वांच्या डोक्यावर आहे, हे लक्षात घ्या.‌
प्रा. दिपक तडाखे व राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले यांनी आभार मानले.

कराड उड्डाणपुलासाठी सिंगल पिलर कल्पना मांडली…- पृथ्वीराज चव्हाण

मी केंद्रात मंत्री होतो, तेंव्हा राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी संजय मिश्रा हे माझ्याबरोबर काम करत होते. त्यांच्याकडून मी कराडला उड्डाणपूल करण्यासाठी प्रयत्न केले. आता हा ५४० कोटी रुपयांचा पुल उभारला जात आहे. सिंगल पिलर ही कल्पना मांडली.‌ त्यामुळे भविष्यात कराड उड्डाणपुलामुळे ट्रॅफिक कमी होणार असून राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक वारंवार खोळंबणार नाही. त्यावेळेस चौदापदरी मार्ग करण्यासाठी प्रयत्न झाले नसते, तर हे काम झालेच नसते. या महत्त्वकांक्षी कामामुळे पुढील तीस वर्षासाठी कराड आणि मलकापूर भागाचा रहदारीचा प्रश्न सुटला आहे.

आ. बाळासाहेबांच्या आगमन होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष…

दत्त चौकातील या सभेत कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांचे मंचावर आगमन झाले. तेंव्हा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ते जेंव्हा भाषणाला उभे राहिले, तेंव्हा त्यांच्यासमवेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनीही उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. त्यामुळे आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, अॅड. उदयसिंह पाटील या नेत्यांची गठ्ठी झाल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close