मराठा समाजाला 13 जुलै च्या आधी 50 टक्केच्या आतील आरक्षण द्या ; आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरे अंमलबजावणी करा – मनोज जरांगे-पाटील
चांगभलं ऑनलाइन |
13 जुलैच्या आधी मराठा समाजाला ओबीसीमधून 50 टक्क्याच्या आतील आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या व्याख्येप्रमाणेच सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी. तसेच 13 जुलै पूर्वी सर्व गुन्हे मागे घ्यावेत, आणि शिंदे समितीला एक वर्षासाठी मुदतवाढ द्यावी. बॉम्बे गर्व्हमेन्ट गॅजेट व सातारा गर्व्हमेन्ट गॅजेट, जे आमचे ठरलेले विषय व मागण्या आहेत, त्या पूर्ण कराव्यात, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
ओबीसींना आरक्षण आहे तरी ते एवढे लढताहेत मग आम्हाला तर आरक्षणच नाही, तेंव्हा आम्ही किती लढले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण नाही, त्यामुळे ते मिळवण्यासाठी घरात मतभेद असेल तरी ते आम्ही बाजूला ठेवू. आरक्षणासाठी शेतकरी, माथाडी कामगार, रिक्षावाले सगळे मराठे एक होतील. खानदानी मराठे मतभेद सोडून एकत्र येतील , असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना मराठे आता उघडे पाडल्याशिवाय थांबणार नाहीत. मराठे आता जागे झालेत. त्यामुळे आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे, असं सांगून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.
भुजबळ हा लोकांच्या लेकराचे मुडदे कसे पडतील? हे पाहत आहे. मराठ्याच्या लेकराच्या नरड्याला नख लावायच काम त्याने आयुष्यभर केलंय. त्यांच्याकडून अपेक्षा नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.