चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
“मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची,
तू चाल पुढे तुला रे गड्या
भीती कशाची, परवा बी कुणाची”
असं ज्यांच्या बाबतीत म्हणावं असं वाटतं ते म्हणजे कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक गावचे नेते शिवाजीराव रंगराव मोहिते (सरकार) होत. आज त्यांचा 59 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्त…
राजकीय वारसा आणि शिक्षण…
शिवाजीराव मोहिते तथा आप्पा यांचा जन्म पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडोली या आजोळच्या गावी झाला. त्यांचे मामा यशवंत एकनाथ पाटील हे पन्हाळा तालुक्याचे 35 वर्षे आमदार होते. त्यांच्याकडूनच शिवाजीराव मोहिते यांना राजकीय वारसा मिळाला. त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण वारणानगर येथे झाले तर कराडच्या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातून त्यांनी बी ए आणि एम ए ची पदवी घेतली. गावची पाटीलकी त्यांच्या घराण्याकडे होती. राज्य शासनाने तंटामुक्त समित्या अलीकडच्या काळात सुरू केल्या मात्र बेलवडे बुद्रुक गावात शिवाजीराव मोहिते यांच्या घरात पूर्वीपासून गावातले तंटे गावातच सोडवले जात असत. त्यांचे चुलत बंधू स्व. धनाजीराव मोहिते (सरकार) यांचे भागात मोठे राजकीय वलय होते. त्यांचा शब्द गावात प्रमाण मानला जात होता. एखाद्या वादाचा विषय असला तर कोणावर अन्याय होऊ न देता विषय कसा मिटेल. आणि सर्वानुमते मान्य होईल असा तोडगा कसा निघेल असा त्यांचा प्रयत्न असायचा, गावातील लोक आजही त्याबद्दल आवर्जून सांगत असतात. हाच वारसा पुढे शिवाजीराव मोहिते आप्पा यांनी आजही जपला आहे.
1989 पासून राजकारणात सक्रिय….
स्वर्गीय धनाजीराव मोहिते यांच्यासोबत 1989 सालामध्ये शिवाजीराव मोहिते तथा आप्पा हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले. त्यापूर्वी त्यांनी कृष्णा साखर कारखाना, जयवंत शुगर, डोंगराई साखर कारखाना या ठिकाणी कृषी अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले होते.
सन 2012 नंतर ते माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर राजकारणात सक्रिय झाले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांनी हाती घेतला. या काळात गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवडणुकांसाठी त्यांनी बेलवडे बुद्रुक पंचक्रोशीसह काले जिल्हा परिषद मतदार संघ पिंजून काढला. या विभागातून त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी कंबर कसली होती.
काँग्रेस पक्षाकडून उचित सन्मान…
त्याची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही यथायोग्य दखल घेतली. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस सेवा दल संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षपदावर शिवाजीराव मोहिते आप्पा यांची वर्णी लागली. सध्या त्यांच्यावर पाटण विधानसभा मतदार संघासाठी काँग्रेसचे प्रभारी निरीक्षक म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत राबवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे.
भागात अन् गावात कोट्यावधींची विकास कामे मार्गी…
आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्ती निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून शिवाजीराव मोहिते आप्पा ओळखले जातात. याचा त्यांनी गावाच्या आणि भागाच्या विकासासाठी उपयोग करून घेतला. गावातील शंभर टक्के डांबरीकरण, परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे सात ते आठ किलोमीटरचे काँक्रिटीकरण, सहा शाळा खोल्यांचे बांधकाम, पाच अंगणवाड्यांचे बांधकाम, ग्राम सचिवालयाची इमारत तसेच जलजीवन मिशनची प्राथमिक मंजुरी त्यांनी मिळवून घेतली. गावातील मुख्य अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून घेतले. कासेगाव-बेलवडे-मालखेड यादरम्यानच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण यासाठी निधी आणला. गावातील मागासवर्गीय समाजांना सामाजिक सभागृहांसाठी त्यांनी निधी आणला. गावच्या ओढ्यावर कुंभार की शिवारात जलसंधारणातून बंधारा बांधून घेतला. अशी विविध प्रकारची काले जिल्हा परिषद मतदार संघात त्यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे त्यांचे नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून करून घेतली. गावासह पंचक्रोशीतील विद्यार्थी, युवक यांचे प्रश्न त्यांनी सोडवले. गरीब विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कोर्ससाठी प्रवेश मिळवून दिला. काही युवकांना नोकऱ्या मिळवून दिल्या. काही युवकांना शासनाच्या विविध योजनांमधून कर्जे मिळवून स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याकडून विकासाची कामे आणि सामाजिक स्तरावर तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्येक कार्याला कुटुंबाची मोलाची साथ…
शिवाजीराव मोहिते आप्पा यांचा निपाणी तालुक्यातील ममदापूर येथील उच्च विद्याविभूषित सौ. स्मिता यांच्याशी 1995 मध्ये विवाह झाला. त्यांच्या अर्धांगिनी सौ. स्मिता यांनी त्यांना आजपर्यंत प्रत्येक कार्यासाठी खंबीरपणे साथ दिली आहे. त्याही गावातील सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सहभागी होत असतात. या दाम्पत्याला राजनंदिनी, राजकिरण, राजबाला अशा तीन सुकन्या तर ज्योतिरादित्य नावाचा सुपुत्र आहे. शिवाजीराव मोहिते यांच्या कार्याला त्यांचे बंधू संताजीराव आणि सयाजीराव यांची आजपर्यंत नेहमीच साथ मिळाली आहे. त्यामुळे समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून गावचा विकास असं या कुटुंबाचं ब्रीद राहिलं आहे. आज 59 व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्यांचा हक्काचा आधारवड असलेल्या शिवाजीराव मोहिते आप्पा यांना कोटी कोटी शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो, ही सदिच्छा!!