कराड उपविभागात यापुढे वाहतुकीच्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी – जिल्हा न्यायाधीश दिलीप भा. पतंगे
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड व पाटण तालुक्यात यापुढे विना वाहन परवाना आणि विमा नसणाऱ्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित विभागांना सक्त सूचना देण्यात आल्या असून यापुढे वाहतुकीच्या नियमांबाबत कठोर अंमलबजावणी होणार असल्याचे प्रतिपादन कराड येथील जिल्हा न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी केले, तसेच दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्याबाबत नागरिकांना त्यांनी आवाहन केले.
येऊ घातलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाच्या खटल्यांबाबत कराड न्यायालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शिरीष पोकळे, कराड शहर वाहतूक विभागाचे प्रमुख संदीप सूर्यवंशी, परिवहन अधिकारी संदीप बिटले, अपघात क्षेत्रातील प्रख्यात विधीज्ञ उपेंद्र पराडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी न्यायाधीश पतंगे म्हणाले, कराड शहरालगत राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची नेहमीच वर्दळ असते, कराड व पाटण तालुका हे समृद्ध तालुके असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात, यामध्ये बऱ्याचदा प्रमुख कारण हे विना परवाना वाहन किंवा नशा पान करून वाहन चालवणे हे आहे, एका छोट्याशा चुकीमुळे एखाद्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होते, त्यावेळी जर वाहनाचा विमा नसेल तर त्या कुटुंबास विमा नुकसान वसूल करताना अनंत अडचणी येतात त्यामुळे वाहन परवाना आणि वाहनाचा विमा या अत्यंत आवश्यक बाबी आहेत, लोकांनी याबाबतीत जागृत होणे अत्यंत आवश्यक आहे या अनुषंगानेच तसेच राष्ट्रीय लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर आज कराड न्यायालयात तातडीची बैठक आयोजित केली आहे.
परिवहन अधिकारी शिरीष पोकळे म्हणाले, कराड आणि पाटण तालुक्यातील वाहनधारकांनी विनापरवाना वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, सुदैवाने कराड तालुक्यात कराड आणि पाटण तालुक्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय असून अत्यंत अल्प दरात या ठिकाणी वाहन परवाना कागदपत्रांची पडताळणी आणि चाचण्या घेऊन देण्यात येणार आहे. विना विमा वाहन आढळल्यास अशा वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक शाखेचे संदीप सूर्यवंशी म्हणाले, कराड शहरात आम्ही दररोज ऑनलाईन दंड आकारत असतो, विना वाहन परवाना आणि विना विमा वाहनांवर यापुढे आम्ही देखील कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे. नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने झालेला दंड राष्ट्रीय लोक अदालत मध्ये येऊन भरण्याचे आवाहन सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
यावेळी ऍड उपेंद्र पराडकर म्हणाले, विना विमा गाडी चालवून एखादा अपघात घडल्यास आयुष्यातील सर्व कमाई यासाठी नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागू शकते यामुळे वाहनांचा विमा उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. सदर बैठकीस विधी समन्वयक राजेंद्र भोपते उपस्थित होते.
पक्षकारांचे आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक नुकसान होऊ नये म्हणून लोक न्यायालयात सामंजस्याने खटले मिटवले जातात, यामध्ये कोणाचीही हार किंवा जीत होत नाही दोन्ही पक्षांना समान न्याय मिळतो, यासाठी राष्ट्रीय लोक आदालत मध्ये हिरीरीने सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हा न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी केले.