सैदापुरातील श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नाने ९.७२ कोटींचा निधी मंजूर – changbhalanews
Uncategorized

सैदापुरातील श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नाने ९.७२ कोटींचा निधी मंजूर

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सैदापूर (ता. कराड) येथील प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महायुती सरकारने मान्यता दिली आहे. तसेच ९ कोटी ७२ लाखांच्या निधीस मंजुरी दिली आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास प्रारंभ होणार असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

कृष्णा-कोयनेच्या तीरावर वसलेल्या सैदापूर गावाच्या पवित्र भूमीत, कृष्णामाईच्या तीरावर पूर्वाभिमुखी असे श्री पावकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. श्री पावकेश्वर मंदिराचे बांधकाम हे साधारण १७ व्या शतकात झालेले असून, मंदिरावर अनेक दुर्मिळ शिल्पकलेचे नमुने पाहावयास मिळतात. अशा या प्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांमधून सतत होत होती. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत, सैदापुरातील या प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती.

ना. फडणवीस यांनी डॉ. अतुल भोसले यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जिर्णोद्धार योजनेत श्री पावकेश्वर मंदिराचा समावेश करत, ग्रामस्थांच्या सूचना विचारात घेऊन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. दरम्यान, सैदापूर येथील रहिवासी असलेले व महाराष्ट्र विधीमंडळातील माजी सचिव श्रीनिवास जाधव यांनी श्री पावकेश्वर मंदिराचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मांडलेल्या प्रस्तावाला शासनाने मान्यता देत, श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी व परिसर विकासासाठी ९ कोटी ७२ लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.

डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम लवकर मार्गी लागण्यास मदत झाली आहे. श्री पावकेश्वर मंदिराचा प्राचीन सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी डॉ. अतुलबाबांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल सैदापूरवासीयांतून व भाविकांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

प्राचीन वारसा लाभलेले श्री पावकेश्वर मंदिर

या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य असे, की शिवलिंगावर ओतलेले पाणी हे बहुतांश मंदिरांमध्ये गोमुखातून बाहेर जाते. पण श्री पावकेश्वराच्या ठिकाणी मात्र अपवाद आहे. इथं गोमुखाऐवजी मकरमुखातून (मगरीचे तोंड) बाहेर जाते. असे शिल्प फार कमी मंदिरात पहावयास मिळते. मंदिराच्या आवारात एक प्राचीन विहीर होती, परंतु ती कालांतराने मूजविण्यात आली. पण त्या विहिरीचे चौथेरे अजूनही दिसून येतात. पूर्वेच्या दरवाजाबाहेर उंच अशी एक दीपमाळ असून, ही दीपमाळ १३ व्या शतकातील असावी, असे मानले जाते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close