चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: कराड दक्षिणमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना ‘सहज शिक्षा लर्निंग’ या शैक्षणिक ॲपचे मोफत वितरण केले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीचे डॉ. अतुलबाबा भोसले यांनी याकामी पुढाकार घेतला असून, सोमवारी (ता. ५) सकाळी १० वाजता कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह (टाऊन हॉल) येथे विद्यार्थी – पालक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षण हा सर्वांचा जिव्हाळ्याचा व अत्यंत आवश्यक घटक आहे. पारंपारिक शिक्षणाबरोबरच डिजीटल साधनांचा वापर करुन शिक्षण मिळाले, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला अनुसरून, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, यासाठी ‘सहज शिक्षा लर्निंग’ ॲप्लिकेशन बनविण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने मुलांना त्यांच्या सोयीच्या वेळेत कधीही, कोठेही झालेल्या अभ्यासाची उजळणी करणे शक्य होणार आहे. प्रत्येक चॅप्टरवर आधारित प्रश्न, अनेक सराव प्रश्नपत्रिका, दर आठवड्याला टेस्ट, प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञांचे नियमित मार्गदर्शन या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.
या शैक्षणिक ॲप्लिकेशनची वार्षिक फी ७००० रुपये आहे. मात्र कराड दक्षिणमधील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी हे शैक्षणिक ॲप विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात कराड दक्षिणमधील १० हजार विद्यार्थ्यांना या शैक्षणिक ॲपचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी (ता. ५) सकाळी १० वाजता कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह (टाऊन हॉल) येथे विद्यार्थी – पालक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात या ॲपची माहिती दिली जाणार असून, उपस्थितांना त्यांच्या मोबाईलमध्ये लगेचच ॲप इन्स्टॉल करुन दिले जाणार आहे. या मेळाव्याला विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच येताना सोबत आपला मोबाईल फोन अवश्य घेऊन यावे, असे आवाहन शिक्षक आघाडीचे संयोजक सतीश चव्हाण यांनी केले आहे.