कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे दिमाखात औपचारिक उद्घाटन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी १८ व्या प्रदर्शनाचे प्रगतशील शेतकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते फीत कापून औचारिक उद्घाटन आज पार पडले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील (दादा), कराड बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपसभापती संभाजी चव्हाण, बाजार समिती संचालक नितीन ढापरे, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई , व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, कोयना बँकेचे चेअरमन रोहीत पाटील , रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड , शामराव पाटील पतसंस्थेचे चेअमरन बळवंत पाटील, संचालक सतीश इंगवले, राजेंद्र चव्हाण, प्रकाश पाटील, संभाजी काकडे, सर्जेराव गुरव, जगन्नाथ लवंड, गणपत पाटील, श्रीमती इंदिरा पाटील, रेखाताई पवार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विद्यमाने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला आज शुक्रवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. उद्या शनिवारी (दि. २५) मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन होणार आहे.
१० लाखांहून अधिक लोक लावतात हजेरी..
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, दिवंगत विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली होती. यंदाचे १८ वे प्रदर्शनस्थळी डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने उत्तम प्रकारे व्यवस्थापन करण्यात आले आहे. दरवर्षी अंदाजे १० लाखांहून अधिक लोक या प्रदर्शनाला हजेरी लावतात. शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान या प्रदर्शनात पाहायला मिळते.