उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी उद्यापासून महामार्गावर बेमुदत रास्ता रोको – changbhalanews
शेतीवाडी

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी उद्यापासून महामार्गावर बेमुदत रास्ता रोको

राजू शेट्टींचा इशारा : कृष्णा कारखान्याबाबत सांगितलं 'असं' काही

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
साखर कारखानदारांना तुटून गेलेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे बुडवायचे आहेत. ते निवडणुकीत वापरायचे आहेत. तसेच त्यामुळे सहकारी साखर कारखानदार आणि खाजगी साखर कारखानदार एकत्र आले आहेत, शेतकऱ्यांचा आंदोलन मोडीत काढण्याचा त्यांनी डाव आखला आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जरा कड काढा आपल्याला मागील ४०० रूपये घ्यायचे आहेत आणि चालू हंगामातील ३५०० रूपये प्रमाणे पहिली उचल घ्यायची आहे, त्यामुळे काही झालं तरी उद्या २३ नोव्हेंबरला पुणे-बेंगलोर महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलाजवळ बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, ऊसदराची चळवळ आम्ही सुरू केली, त्यावेळी सोलापूरच्या मोहिते पाटलांचा कारखाना, माळेगावचा कारखाना आणि कृष्णा कारखान्याचे उदाहरण आम्ही सांगायचो. या साखर कारखान्यांना जर दर द्यायला परवडतो तर इतरांना का परवडत नाही अशी भाषणं आम्ही त्यावेळी करायचो, अशी आठवण सांगत, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याच्या चळवळीत रेठरेच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचं नाव आणि सहकारी साखर कारखानदारीतील योगदान त्यांनी अधोरेखित केलं.

गेल्या अडीच महिन्यापासून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आणि काही प्रमाणात सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाचा अंतिम टप्पा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवार दि. २१ रोजी गुरूवारी, २३ रोजी होणाऱ्या आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पार्ले तर्फ ठाणे व सातवे येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या सभेत माजी खा. राजू शेट्टी यांनी या ऊसदर आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

शेट्टी म्हणाले, मी जिल्हा परिषद सदस्य असताना २००२ साली ऊसदरासाठी पहिलं आंदोलन केलं. त्यावेळी सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढायला राजू शेट्टी निघाले आहेत, शेट्टी म्हणजे भस्मासुर आहे असा अपप्रचार कारखानदारांनी केला. मात्र गेल्या २१ वर्षात साखर कारखानदारी मोडीत निघाली नाही तर कारखाने अधिक चांगले चालायला लागले, मजबूत झाले, शेतकऱ्यांना मिळणारा ऊसदर उत्तरोत्तर वाढत गेला. ऊस दराच्या या आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला आम्ही सोलापूरच्या मोहिते पाटलांचा कारखाना, माळेगावचा कारखाना, सातारा-सांगलीचा कृष्णा कारखाना यांची उदाहरणे द्यायचो. या साखर कारखान्यांना जर एवढा दर द्यायला जमतो तर मग इतर कारखान्यांना का नाही अशी भाषणं आम्ही त्यावेळी करायचो. त्यातून शेतकऱ्यांची चळवळ उभी राहत गेली. आज कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने मजबूत झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासारखा उसाचा दर अन्यत्र मिळत नाही असे राज्यातील शेतकरी सांगतात. हेच गेल्या वीस वर्षातील आपल्या शेतकरी चळवळीचं यश आहे. मात्र जेथे चळवळ भक्कम झाली नाही शेतकऱ्यांचा अंकुश राहिला नाही त्या जिल्ह्यातील साखर कारखाने आजारी पडायला लागले, काही ठिकाणी मोडीत निघाले. त्यामुळे साखर कारखानदारीला शिस्त लावायचं काम शेतकऱ्यांच्या चळवळीने केलंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

आजही आम्ही साखर कारखानदाराकडे जे पैसे मागतोय ते हिशोबाने मागतोय. या वर्षी आम्हाला पैसे देता येतील अशी त्यांची गेल्या वर्षीची आर्थिक परिस्थिती राहिली आहे. पैसे देऊ शकतील अशी त्यांची ऐपत निर्माण झाली आहे, मात्र साखर कारखानदारांना विशेषता सहकारी कारखानदारांना हे पैसे बुडवायचे आहेत. त्यांना ते विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी वापरायचे आहेत. सहकारी कारखानदार असे वागायला लागल्याने खाजगी कारखानदारांचा तर आपणाकडे शेतकऱ्यांचे काही देणे घेणे राहिलेलं नाही असा अविर्भाव आहे. सहकारी कारखानदार जर मागचं काही देत नाहीत तर आपण तर कशाला द्या अशी मानसिकता खाजगी कारखानदारांनी आज केली आहे. पण सहकारी किंवा खाजगी साखर कारखानदार असो त्यांचं नाक दाबलं की तोंड उघडतं हे आम्हाला पण चांगलं माहित आहे, असं सांगून राजू शेट्टी म्हणाले की, साखर कारखान्याचे कामगार आणि ऊस वाहतूकदार यांनी आजपर्यंत केलेल्या मागण्यांना, त्यांच्या आंदोलनाला आजवर कधीही शेतकऱ्यांनी विरोध केलेला नाही हे लक्षात घ्यावं. उलट टोळ्यांनी पैसे बुडवल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस वाहतूकदारांच्या मदतीला धावली. त्यामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या ८५० मुकादमांच्यावर गुन्हे दाखल झाले असून गेल्या चार महिन्यात २७ कोटींची वसुली झाली आहे.

त्यामुळे जर शेतकऱ्यांचे पैसे बुडवायला खाजगी आणि सहकारी साखर कारखानदार एकजूट करत असतील तर गावागावातील शेतकऱ्यांनीही तात्पुरतं पक्षभेद, मतभेद बाजूला ठेवून आपल्या घामाचे दाम मिळवण्यासाठी एकत्र यायला काय हरकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता एकजूट दाखवली पाहिजे. ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली म्हणून जर शेतकऱ्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर आम्हालाही आरटीओच्या दारात बसावं लागेल किंवा आरटीओला कारखान्याच्या दारात बसायला भाग पाडावं लागेल. मग नियम मोडणाऱ्या वाहतूकदारांच्यावरही गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही., असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

पूर्वनियोजित ठरवून साखर कारखानदारांनी आम्ही शेतकऱ्यांचे मागचे काही देणे लागत नाही असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली बैठकही निष्फळ ठरली आहे, त्यामुळे आता तुटून गेलेल्या उसाचे पाठीमागचे चारशे रुपये आणि गळिताला जाणाऱ्या उसाला ३५०० रुपये पहिली उचल मिळण्यासाठी आता शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईत उतरावे‌. उद्या २३ नोव्हेंबरला पुणे-बेंगलोर महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलाजवळ बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू होईल, त्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आजच सायंकाळपर्यंत सरकार, साखर कारखानदार यांनी घ्यावेत व ते जाहीर करावेत, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

राजू शेट्टींनी उपस्थित केलेले मुद्दे –

१) सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी मागच्या हंगामात तुटलेल्या ऊसाला जादा दर देता येत नाही हे सांगण्यासाठी दिलेल्या हिशोबात सुद्धा सरासरी १५० ते ३०० रुपये ज्यादा दर प्रत्येक कारखाना देऊ शकतो.
२) सेविंग बगॅसचे हिशोबात पण त्यापासून तयार झालेल्या विजेचा नफा हिशोबात धरलेला नाही.. सिरप मोलेसिस हिशोबात पण त्यापासून तयार झालेला इथेनाॅलचा नफा हिशोबात धरलेला नाही.
३) उसापासून साखरेचा उतारा कमी करून तयार केलेल्या इथेनॉलचा नफा देण्याऐवजी तेवढ्याच उताऱ्याच्या साखरेचा दर दिला जातोय.
४) एक-दोन कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला पण इतर कारखान्यांनी एकजूट करून त्यांना गप्प बसवलं.
५) मार्च २०२३ अखेर शिल्लक साखरेच्या मूल्यांकनामध्ये तफावत आहे. कारखान्यांनी साखरेचे दर २९०० ते ३६०० रुपये पर्यंत प्रतिक्विंटल दाखवून मार्च अखेरचाच हिशोब केला आहे.
६) मार्च २०२३ नंतर विकलेल्या साखरेचे दर दाखवलेल्या मूल्यांकनापेक्षा दर जास्त होते. सन २०२२ -२३ मध्ये उत्पादित झालेली सत्तर टक्के साखर मार्च २०२३ नंतर विकली गेली आहे.

दुसरा हप्ता मोठ्या कारखान्यांनी अगोदर द्यावा, मग छोटे कारखान्यांना तो द्यावाच लागेल…
सातारा जिल्ह्यातही आम्ही साखर कारखान्यांकडे ४०० रुपये दुसऱ्या हप्त्याची मागणी केली आहे. कराड तालुक्यात गतवर्षी कृष्णाची रिकवरी १२६१, जयवंत शुगरची १२४९, सह्याद्रीची १२४१, तर रयत-अथणीची १२३१ होती. यामधील कृष्णा कारखान्याने ३००० रू. पहिली उचल दिली होती, दीड महिन्यापूर्वी त्यांनी दुसरे बिल १०० रुपये प्रमाणे दिले, ते फायनल बिल नाही. जयवंत शुगरने पहिली उचल २९५१ रू. दिली होती. महिन्यापूर्वी त्यांनी ५० रुपये प्रमाणे फायनल बिल दिले. तर रयत अथणीने एकरकमी २९२५ रु. दिले आहेत, वाढीव काहीही दिलेले नाही. सह्याद्रीने आत्तापर्यंत ३०१० रू. दिले आहेत. त्यामुळे कोणत्या कारखान्यांची रिकवरी किती आणि आत्तापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेत किती याचं गणित आता शेतकऱ्यांनी करावं. जिल्ह्यातील सर्वच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता जाहीर करावा. ज्यांनी दुसरा हप्ता म्हणून बिल दिले आहे, त्यांनी आता फायनल बिल द्यावे. दुसरा हप्ता ४०० रुपये आणि पहिली उचल ३५०० रुपये या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील शेतकरी उद्या कोल्हापूर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनात सहभागी होतील.
देवानंद पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, सातारा जिल्हा.

मोजके कारखाने वगळता दुसरा हप्ता कोणीही दिलेला नाही…
सातारा जिल्ह्यात मोजके साखर कारखाने वगळता कोणत्याही साखर कारखान्याने तुटून गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता अद्याप दिलेला नाही. कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केली आहे पण अधिकचे पैसे द्यायला टाळाटाळ सुरू केली आहे. मागील दुसरा हप्ता आणि यंदाची पहिली उचल या मागणीसाठी यापुढे जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढेल हे लक्षात घेऊन तातडीने कारखानदारांनी दुसरा हप्ता जाहीर करावा.
राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा जिल्हा.

सातारा जिल्हा अन् ऊसदर आंदोलन…

ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आत्तापर्यंत तीन मोठी आक्रमक आणि उग्र आंदोलनं केली आहेत. त्यामधील २०१२ मध्ये बारामती येथे झालेले आंदोलन वगळता अन्य दोन आंदोलनं सातारा जिल्ह्यातच अन् तेही कराड तालुक्यात झाली आहेत. त्यामध्ये २०१३ मध्ये वाठार येथे महामार्गावर चक्काजाम करण्यात आला होता तर पुढच्याच वर्षी म्हणजे २०१४ मध्ये पाचवड फाटा येथे ऊस परिषद घेऊन महामार्ग रोको आंदोलनं करण्यात आलं होतं. या आंदोलनावेळी अनेक वाहनांची जाळपोळ झाली होती तर संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल झाले होते. मात्र त्यावेळी संघटनेपासून आज दुरावलेले अनेक नेते या आंदोलनात राजू शेट्टींच्या समवेत अग्रभागी होते.

मुंबईतील बैठकीकडे नेत्यांसह राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष…

उद्या कोल्हापूर जिल्ह्यात पुणे-बेंगलोर महामार्ग रोको आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील मंत्र्यांची, साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची मॅरेथॉन बैठक सुरू आहे. सायंकाळपर्यंत या बैठकीतून काय तोडगा निघतोय का, काही निर्णय जाहीर होताहेत का, याकडे राज्यभरातील शेतकरी नेत्यांचे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार सहकार मंत्री व राज्य शेट्टी यांच्या प्रतिनिधीमध्ये सुरू असलेली मुंबई येथील बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सायंकाळपर्यंत आणखी कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close