कराडला साडेपाचशे मृतदेहांचे अग्निकाष्ठ सरपणात दहन ; वैकुंठधाम सुधार समितीकडून दहनाला आवश्यक साहित्यही पुरवले जाणार

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची खुप मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. पर्यावरण रक्षणाची समाजातील प्रत्येक घटकाने आपआपल्या परीने जबाबदारी घेणे आवश्यक आहे.पर्यावरण रक्षण हा उद्देश ठेवुन आम्ही वैकुंठधाम सुधार समिती या संस्थेच्या माध्यमातुन व कराड नगर परिषदेच्या सहकार्याने दहनासाठी मोठ्या प्रमाणात होणार्या वृक्षतोडीला आळा बसावा म्हणुन पाला पाचोळा, बगॅस, शेंगाची टरफले, शेण व मळीची माती या पर्यावरण पुरक पदार्थामधुन बनविण्यात आलेले अग्निकाष्ठ हे सरपण दहनासाठी उपलब्ध केले गेले आहे. गेली दोन वर्षे हा उपक्रम सुरु असुन कराडकर नागरीकही या उपक्रमाला उत्तम सहकार्य करत आहेत. विनायक पावसकर अध्यक्ष असलेल्या समितीमधे उपाध्यक्ष सागर बर्गे, सचिव सुधीर एकांडे, खजिनदार महेंद्रकुमार शाह, तर सदस्य म्हणून नितीन शहा, चंद्रकांत जिरंगे, सुरेश पटेल, विनियक विभुते, प्रकाश जाधव ही मंडळी कार्यरत आहेत.
कराड शहरातील आतापर्यत साडेपाचशे मृतदेहांचे दहन अग्निकाष्ठ सरपणात झाले आहे. १ जानेवारी २०२४ पासुन कराड नगर परिषदेने अग्निकाष्ठ सरपणात झालेले दहन विनामुल्य केले असुन आजअखेर जवळपास तीनशे मृतदेहांचे दहन विनामुल्य करण्यात आले आहे.
दहनासाठी आजपर्यत फक्त सरपण विनामुल्य देण्यात येत होते. दि.१५ मार्च २०२५ पासुन दहनाला आवश्यक अन्य साहित्य कापड, सुतळी, मडके, कापुर, हळद-कुंकु-गुलाल व बुक्काही विनामुल्य देण्यात येणार आहे. ही सवलत कराड शहरातील रहीवाशांसाठी असुन फक्त अग्निकाष्ठ सरपणात होणार्या दहनासाठी दिली जाणार आहे.
वैकुंठधाम सुधार समितीने गेल्या दोन वर्षात दहनासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर स्मशानभुमी परिसरही नगरपरिषदेच्या सहकार्याने सुशोभित करण्यास सुरूवात केली आहे. यामधे पुर्ण स्मशानभुमी काॅंक्रीटीकरण, सर्व दहन शेडची दुरुस्ती, नव्याने दोन शेडची उभारणी, प्रेक्षागॅलरी बैठक व्यवस्थेत सुधारणा, लाईट व पंख्यांची सुविधा, रेलींग बसविणे, स्मशानभुमीत फ्लड लाईट बसवुन पुरेशी प्रकाश व्यवस्था, रंगकाम, वृक्षारोपण, स्मशानभुमीसमोर मोठी पार्किंग व्यवस्था, भगवान शंकर मुर्ती प्रतिष्ठापना, पाणपोई, संपुर्ण स्मशानभुमीत सी.सी.टि व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अंघोळीसाठी गरम पाणी, केश वपनासाठी अद्ययावत व्यवस्था, या सुविधा पुर्णत्वास गेल्या असुन स्मृतीवनाचे काम प्रगतीपथावर आहे. या सर्व कामांमधे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. शंकर खंदारे, शहर अभियंता श्री. गायकवाड, आरोग्य अभियंता श्री. काकडे साहेब व कर्मचारी वर्गाचे अमुल्य सहकार्य लाभले आहे. कराड कापड व्यापारी संघ, श्रीकमल प्रतिष्ठान, श्री. प्रकाश जाधव व अनेक संस्था व दानशुर व्यक्तिंचे पाठबळ लाभले आहे.
पुढील काळात दशक्रिया विधीसाठी इमारत, स्टोअर व कार्यालय इमारत, अभ्यासिका या इमारतींचे काम सुरु करण्यात येणार आहे. तसेच वहानतळ व संपुर्ण स्मशानभुमीला अद्यावत संरक्षण भिंतीचे कंपौंड करण्यात येणार असुन वहानतळावर व स्मशानभुमीत मध्यवर्ती ठिकाणी हायमाॅस उभारण्यात येणार आहे. पुर्वी रक्षा विसर्जन नदीपात्रात होत होते मात्र समितीच्या आवाहनाला कराडकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने शास्रापुरतीच रक्षा नदीत सोडली जाते, उर्वरित रक्षा खतासाठी पाठविली जाते.भविष्यात रक्षा कुंड बांधण्यात येणार आहेत. तसेच निधन झाल्यावर अग्निसंस्कारास काही कारणाने विलंब होणार असेल असे मृतदेह ठेवण्यासाठी शितपेटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा विविध सुविधांसाठी नागरीकांनी पुढाकार घेवुन वैकुंठधाम सुधार समितीस आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे.
प्रत्येकाचा शेवटचा प्रवास स्मशानभुमीत होतो. हा परिसर निटनेटका व सुंदर असावा व ही सर्वांची जबाबदारी आहे.
स्मशानभुमीत येणार्या प्रत्येकाने या परिसराचे मुल्य जपावे, स्वच्छता राखावी, गुटखा, पान, तंबाखु खावुन स्मशानभुमी परिसर अस्वच्छ करु नये. प्रत्येक शेड जवळ दिलेल्या हौद्यामधेच मृताचे उर्वरित साहीत्य टाकावे अन्यत्र घाण करु नये. दहन व दशक्रिया विधीला वापरलेले साहित्य व्यवस्थित वापरावे.– सुधीर एकांडे, सचिव
वैकुंठधाम सुधार समिती. कराड.