कराडला 11 देशांतील तज्ज्ञ करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन
डॉ. सुरेश भोसले, जे. बी. अनिता यांची माहिती : कृष्णा आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सहकारमहर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 17 ते 21 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्यागिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 11 देशांचे तज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती य. मो. कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व सेंद्रिय शेतीसाठी आंतरराष्ट्रीय सक्षमता केंद्र बेंगळूरूच्या व्यवस्थापिका जे. बी. अनिता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, संचालक धनंजय पाटील, कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील, शुअर शॉटचे संदीप गिड्डे उपस्थित होते.
कृष्णा कृषी महोत्सवासाठी सेंद्रीय शेतीसाठी आंतरराष्ट्रीय सक्षमता केंद्र बेंगळूरू (आयसीसीओए) हे नॉलेज पार्टनर असून या केंद्राच्या व्यवस्थापिका जे. बी. अनिता यांनी आज प्रदर्शनाबाबत माहिती दिली. या संस्थेची स्थापना 2004 साली झाली असून देशभर कंपनीचे काम सुरू आहे. सेंद्रीय शेतीचा प्रसार, प्रचार, मार्केटींगची माहिती आपल्या भागातील शेतकऱ्यांना होण्यासाठी 11 देशांचे तज्ज्ञ प्रतिनिधी या प्रदर्शनात भाग घेणार आहेत. सेंद्रीय शेतीसाठी सर्टिफिकेशन महत्वाचे असून निर्यातीसाठी त्याचा मोठा उपयोग होतो. तसेच निर्यातीची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आतापर्यंत दुबई, ऑस्टेलिया, इजिप्त, युरोप, आफ्रिका, संयुक्त अरब अमिरात अशा विविध देशांशी संपर्क झाला आहे. आणखी देशांशी संपर्क सुरू आहे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, प्रदर्शनात सेंद्रीय शेतीची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगळा कक्ष असणार आहे. तसेच परदेशातील तज्ज्ञांशी आपल्या भागातील शेतकऱ्यांना संवाद साधता यावा, यासाठी भाषांतरकार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामाध्यमातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रदर्शनात प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रदर्शनात 400 हून अधिक स्टॉल्स असणार असून 40 स्टॉल शासनाच्या विविध विभागांना राखीव ठेवण्यात आले आहेत. तर 60 स्टॉलवर आधुनिक मशिनरी असणार आहे. 120 स्टॉलवर शेतीच्या अनुषंगाने विविध माहिती असणार आहे. शनिवारी (उद्या) स्टेडियमवर स्टॉल उभारणीच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.
‘रयत’च्या मदतीला कृष्णा म्हणजे “एकमेका सहाय्य करू..”
अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि डॉ. अतुल भोसले यांचे गट राजकारणात एकमेकांच्या विरोधी गट म्हणून ओळखले जातात. दोन्ही गट एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. मात्र काही दिवसापूर्वी रयत साखर कारखान्यात महत्वाची यांत्रिक मोटार नादुरुस्त झाली होती. त्यामुळे गाळप ठप्प होण्याची स्थिती असतानाच ऐनवेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना ‘रयत’च्या मदतीला धावला होता. कृष्णाकडून शिल्लक असलेली मोटार रयतला तातडीने देण्यात आली होती. हे कसे काय झाले? या प्रश्नावर बोलताना कृष्णाचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा हा सहकारातील राज्यातील पहिला साखर कारखाना आहे. जुना आहे. त्यामुळे कारखान्यात कशा अडचणी येऊ शकतात हे आम्हाला माहिती आहे. पूर्वानुभव असल्याने आपल्या कृष्णा कारखान्याने आजपर्यंत अनेकवेळा अनेक साखर कारखान्यांना वेगवेगळ्या स्वरूपाची मदत केली आहे. रयतलाही याच पद्धतीने कृष्णाने मदत केली. यामागे “एकमेका सहाय्य करू..” हे सहकारातील ब्रीद आहे. हाच सहकार आहे. प्रत्येक वेळी राजकारण म्हणून त्याकडे बघून चालणार नाही, अशी भूमिका डॉ. सुरेश भोसले यांनी मांडली.