बनावट दारु तयार करणारी टोळी पकडली कराड तालुक्यात मोठी कारवाई – changbhalanews
क्राइम

बनावट दारु तयार करणारी टोळी पकडली कराड तालुक्यात मोठी कारवाई

कराड तालुक्यात मोठी कारवाई

 

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क तथा दारूबंदी विभागाच्या कराड व सातारा येथील पथकांनी कराड तालुक्यात रविवारी बनावट दारू तयार करणारे जुळेवाडी, रेठरे बुद्रुक व मलकापूर येथील तीन अड्डे उध्वस्त करून पाच जणांना ताब्यात घेत तब्बल वीस लाख रुपयाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा व कराड विभागाने रविवारी, दिनांक 05 नोव्हेंबर रोजी जुळेवाडी ता. कराड गावचे हद्दीत बनावट दारुची वाहतूक पकडून रोहित रमेश सोळवंडे वय 26 वर्षे रा.कुंडल ता.पलूस जि.सांगली याच्या ताब्यातून बनावट देशी दारुचा साठा व एक चारचाकी वाहनासह एकूण 1,94,800 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर संशयीत इसमास चौकशी कामी ताब्यात घेवून जुळेवाडी ता.कराड येथील देशी दारु दुकानाच्या पाठीमागे छापा टाकण्यात आला.

 

त्यामध्ये फैय्याज मुसा मुल्ला वय 53 वर्षे रा.मलकापूर ता.कराड जि.सातारा , शेखर गुणवंत बनसोडे वय 50 वर्षे रा. रा.रेठरे बु.ता.कराड जि.सातारा यांच्या ताब्यातून प्रथम दर्शनी बनावट दारुसाठा तसेच चारचाकी वाहनासह एकूण 1,40,480 रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला गेला. सदर तिन्ही संशयीत आरोपींना सोबत घेवून मलकापूर ता.कराड गावचे हद्दीत ग्रीन लँड हॉटेलच्या पाठीमागे व रेठरे बु.ता.कराड जि.सातारा येथील कॅनॉल चौकी या परिसरातील मुलानकी नावाच्या शिवारात छापे टाकून आयाज आबू मुल्ला वय 53 वर्षे रा.रेठरे बु.ता.कराड जि.सातारा व इर्शाद उर्फ बारक्या शहाबुध्द्दीन मुल्ला वय 34 वर्षे रा. रा.रेठरे बु.ता.कराड जि.सातारा या संशयीतांना ताब्यात घेण्यात आले . त्यांच्या ताब्यातून बनावट दारुचा साठा तसेच बनावट दारु र्निर्मितीसाठी लागणारे साहित्य, कॅप सिलींग मशीन, बनावट लेबले, बनावट बुचे व इतर साहित्‍य असा चार ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये एकूण रुपये 19 लाख 12 हजार 10 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या संशियितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा नुसार गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.

देशी दारू दुकानातून विक्रीसाठी होणार होता वापर…
जुळेवाडी ता.कराड येथील देशी दारु दुकान फैय्याज मुसा मुल्ला याचे आहे. त्याच्या मालकीच्या देशी दारु दुकानात प्रथमदर्शनी सदर बनावट दारुचा साठा विक्री करण्याच्या इराद्याने त्याने जवळ बाळगला होता, असे समोर आले आहे. त्यामुळे सदर देशी दारु दुकानावरही विभागीय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली , राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा व कराड कार्यालयाच्या भरारी पथकांनी केली आहे.

सदर कारवाईमध्ये सर्वश्री निरीक्षक माधव चव्हाण, संजय साळवे, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, शरद नरळे, प्रशांत नागरगोजे सहा.दु. निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सागर आवळे, मनिष माने, भिमराव माळी, अजित रसाळ,आबासाहेब जानकर,राजेंद्र अवघडे, अरुण जाधव, किरण जंगम, सचिन जाधव, राणी काळोखे जवान यांनी सहभाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास निरिक्षक माधव चव्हाण हे करीत आहेत.

दरम्यान, जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी, असे आवाहन सातारा विभागाच्या अधिक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close