गाव ओबीसींचं पण मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना ‘प्रवेश बंदी’
राजकीय बॅनर लावण्यावर निर्बंध : गावाचा एकमुखी निर्णय
चांगभलं ऑनलाइन | हिंगोली
ओबीसी प्रवर्गातून राज्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत आणि आरक्षण मिळावं, या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाजाचे सर्वत्र आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून आरक्षण मिळण्याच्या मागणीला राज्यातील काही ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. मात्र राज्यात असे एक गाव आहे की जे संपूर्ण गाव ओबीसी आहे, मराठा समाजाचं गावात एकही कुटुंब नाही, असं असतानाही या गावाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेत गावात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना ‘प्रवेश बंदी’ घातली आहे. त्यामुळे हे गाव संपूर्ण राज्यात चर्चेत आलं आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे गावागावात सुरू असलेल्या मराठा समाज बांधवांच्या साखळी उपोषणांचं पुढचं पाऊल म्हणून आता आमरण उपोषण सुरू झाली आहेत. ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरसकट कुणबीचे दाखले मिळावेत, अशी मनोज जरांगे-पाटील यांनी प्रमुख मागणी केली आहे. मिळणारं आरक्षण घटनेच्या नियमात बसणारं आणि टिकणारं असावं, असंही त्यांनी सांगितलं आहे. या मागणीला काही ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या परिस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील महादेववाडी या ओबीसींच्या गावानं मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. त्यामुळेच या गावाची चर्चा होत आहे.
महादेववाडी हे सर्वसाधारण 800 लोकसंख्येचं छोटे गाव आहे. गावात मराठा समाजाचे एकही कुटुंब नाही, आहेत ती सर्व कुटूंबं ओबीसीमधील लिंगायत समाजाची आहेत. असं असतानाही गावातील युवकांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे- पाटील यांची मागणी योग्य असून मराठा समाजाला ओबीसींमधून कुणबी आरक्षण मिळायला हवं. गावातील उच्चशिक्षित युवकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यासोबत बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील त्यांच्या मित्रांची स्पर्धा परीक्षेत होणारी निवड ही आरक्षण नसल्यामुळे एका एका गुणांनी हुकली आहे. आरक्षण असतं तर मराठा समाजातील या मित्रांना संधी नक्की मिळाली असती. सर्वच मराठा समाज बांधव सधन आणि उच्च श्रीमंत नाहीत, आसपासच्या गावातील काहीजण या गावातील लोकांच्या शेतात काम करण्यासाठी येत असतात. त्यांना आरक्षण मिळालं तर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल का? या प्रश्नावर बोलताना एका गावकऱ्यांनं तसा आम्ही काहीही विचार केलेला नाही, करतही नाही आणि करणारही नाही. कसंही मिळू द्या, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. आम्ही निर्णय घेतलाय की, मराठा आरक्षणाला जोपर्यंत सरकार मंजूरी देत नाही तोपर्यंत गावात कोणताही राजकीय कार्यक्रम घेता येणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश करता येणार नाही, आणि राजकीय स्वरूपाचे कोणतेही बॅनर गावात लावता येणार नाहीत, असं गावकऱ्यांनी एका वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं.
बॅनरवरही असचं स्पष्टपणे गावकऱ्यांनी नमूद केलंय. ‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, आता मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’ असं घोषवाक्य आणि ‘ओबीसी प्रवर्गातून 50 टक्के आरक्षणातून मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं.’ असं नमूद करत बॅनरच्या सर्वात खाली ‘सकल लिंगायत समाज महादेववाडी, या. वसमत, जि. हिंगोली’ असं नमूद करण्यात आलं आहे.
खासदारांचा राजीनामा, महादेववाडीची चर्चा
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याच जिल्ह्यातील महादेववाडी या ओबीसी लिंगायत समाजाच्या गावानं आता मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी करून टाकली आहे. त्यामुळे या गावाची सध्या राज्यात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.