एव्हरेस्टवीर जितेंद्र गवारे यांचा कराडमधील विद्यार्थ्यांशी संवाद
सरस्वती विद्यामंदिर संकुलात नवे क्षितिज निवासी शिबिर उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालयात शैक्षणिक संकुलाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेले ‘नवे क्षितिज निवासी शिबिर’ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाले. या निवासी शिबिराचे उद्घाटन जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, विश्वस्त नितीन गिजरे, दीपक कुलकर्णी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
विद्यार्थ्यांना विविध साहसी खेळ, समाजकार्य, कला, भारतीय संस्कृति व सांस्कृतिक जीवन याबाबत माहिती मिळावी तसेच समाजातील विविध क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींचा सहवास मिळावा. विद्यार्थ्यांसामोर आदर्श व्यक्तिमत्व असावे, तसेच राष्ट्रभक्ति हा हेतु समोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या निवासी शिबिरात कराड,सातारा, सांगली, कोल्हापूर, वाई, पुणे येथील विविध तज्ञ मान्यवरांनी अनेक विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोहम कुलकर्णी यांनी पर्यावरण रक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सागरमित्र या अभियानाची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांचे पारंपरिक मैदानी खेळ घेतले. वाई येथील प्रसिद्ध कीर्तनकार पूर्वाताई काणे यांनी ‘हिरकणी’ या विषयावर कीर्तन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून सायंकाळी विद्यालयात दीपोत्सव करण्यात आला व त्याचवेळी सुनील ऐवळे यांनी वाद्य परिचय व वादन या सत्रातून विविध वाद्यांचे वादन व गीतांचे सुरेल गायन केले. विद्यार्थी व उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच्या मंगलमय वातावरणात ‘जीवन जगण्याची कला’ या सत्रामध्ये वैशाली काळे यांनी मार्गदर्शन केले. प्रीतिसंगम हास्य परिवारच्यावतीने ‘चला पोटभर हसूया ‘ या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना पोटभर हसवले गेले. हास्य योग प्रकारातून सर्वांमध्ये अक्षरशः चैतन्य निर्माण झाले.
पक्षी मित्र रवींद्र शिंदे यांनी ‘पक्षी-आपले मित्र’ याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगून पक्ष्यांविषयी त्यांच्या मनात प्रेम निर्माण केले. ‘मानव-प्राणी यातील संघर्ष व मैत्री’ याविषयी धनंजय नामजोशी यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. प्रत्यक्षात सर्पाचे दर्शन घडवून सापाबद्दलचे समज गैरसमज याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली. अहिल्याबाई होळकर यांच्या 350 व्या जयंतीचे औचित्य साधून मंजिरी सबनीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी विशेष व्याख्यानाद्वारे अहिल्याबाईंचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला.
भारतातील सिद्धी जमात व कोरलाई किल्ल्याच्या इतिहास याबद्दल रंजक माहिती प्रणव पाटील यांनी पीपीटीच्या आधारे फोटो दाखवत दिली. सरस्वती विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका रूपाली तोडकर व सहकारी शिक्षकांनी ‘स्कूल मिनिस्टर’ या अनोख्या मनोरंजक खेळाचे आयोजन केले. या कार्यक्रमात इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी परिणीती यादव ही स्कूल मिनिस्टर ठरली.
‘संवाद एव्हरेस्ट वीरांशी’ या सत्रात एव्हरेस्टवीर जितेंद्र गवारे यांनी माउंट एव्हरेस्टची गाथा सांगताना त्यांनी अनुभवलेला थरारक प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला.
विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ‘विविध गुणदर्शन’ हा कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले.
शिबिरातील सर्व मान्यवर मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
शिबिराच्या समारोपप्रसंगी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
” नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे आपल्या शाळेतील उपक्रम होत आहेत. विद्यार्थ्यांचा चौफेर विकास व्हावा यासाठी अशी शिबिरे गरजेची आहेत. विद्यार्थ्याना पाठयपुस्तकासोबत बाहेरील ज्ञान याद्वारे देता येते. आनंददायी शिक्षण यापेक्षा वेगळे काहीही नाही.. जनकल्याण प्रतिष्ठान आणि शाळेचे उपक्रम हे समाजाला दिशा देण्याचे कार्य करतात.” असे प्राचार्य विनायक कुलकर्णी यांनी सांगितले.
आदिश्री रैनाक व नचिकेत पाठक या विद्यार्थांना शिबिरातील उत्कृष्ट शिबीरार्थी म्हणून सन्मान चिन्ह व पारितोषिक देवून गौरविण्यात आले. “शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, विविध क्षेत्रातील माहिती त्यांना व्हावी,पर्यावरणाविषयी आस्था निर्माण व्हावी,सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत व्हावी,या उद्देशाने अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन विद्यालयाच्या वतीने करण्यात येते.”, असे मुख्याध्यापिका सोनाली जोशी यांनी सांगितले.
सरस्वती शैक्षणिक संकुलाचे समन्वयक विजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून शिल्पा भुतकर यांनी शिबिर प्रमुख म्हणून काम पाहिले व दिपाली काकडे यांनी संयोजक म्हणून काम पाहिले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.