विजेचे खांब मोडले, झाडे कोसळली, पत्रे उडाले ; कराड तालुक्यातील ‘या’ दोन गावच्या परिसरात मोठे नुकसान

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील तासवडे, वराडे येथे सोमवारी दि. 20 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला. या पावसाने तासवडे येथील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली असून वीज वाहक तारांचे खांब तुटले असून वीज वाहक तारा तुटले आहेत. तासवडेतील बेघर वस्तीतील सुमारे 15 घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एका घरात अडकून पडलेल्या तिघांना तेथील ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी हलविले. वराडे येथे वादळी वाऱ्याने अनेक घरावरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली असून पिके व झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास सोसाट्याच्या वारा वाहत होता. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील तासवडे वराडे परिसराला सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने तासवडे व वराडे येथील अनेक घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तासवडे टोलनाक्यांनजिक असणाऱ्या एमआयडीसी येथील बेघर वस्तीतील सुमारे 15 घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यातील सहा जणांचा संसार उघड्यावर पडला आहे. वारे वाहत असताना घराचा छत उडून गेल्याने अडकून पडलेल्या एका घरातील तिघेजण तेथील ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे बचावले आहेत. सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली यामुळे तासवडे बेगर वस्ती येथील महादेव जगन्नाथ वायदंडे यांच्या घराचा पूर्ण छत उडून गेल्याने संपूर्ण संसार उपयोगी साहित्य, कपडे,धान्य उघड्यावर पडले आहे. तसेच चंद्रकांत अवघडे यांच्या घराचे पत्रे लांब वर उडून गेले. वस्तीतील जनावरांच्या शेडचा छत्र उडून शंभर फुटावर जावून पडला. शेडचे सिमेंटचे पोल वाऱ्याच्या वेगाने मोडले आहेत. तसेच तेजस शिद्रुक, सविता चंद्रकांत शिंदे, संतोष वाघमारे, हनुमंत कुलकर्णी, महादेव ढोकळे, बाबुराव कुलकर्णी, अमर मोहिते, नसीम खान, तानाजी इंगळे, शांताराम कुलकर्णी, शंकर सुतार यांच्या घराचे पत्रे उडाल्याने संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे. तसेच तासवडे गावातील विजय जिजाबा जाधव, राजाराम जाधव, उमेश जाधव, भानुदास खरात यांच्या छप्पर व घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गावातील अनेक विद्युत खांब मोडले असून वीज वाहक तारा पडल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे. तासवडेतील माजी सरपंच राजेंद्र जाधव व अमित जाधव यांनी घटनेनंतर बेघर वस्तीत मदतकार्य केले. सायंकाळी उशीरा पर्यंत महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
वराडे परिसराला ही वादळी वाऱ्याचा जोरदार तडाका बसला वराडे येथील अनेक घरांचे व छपरांवरील पत्रे उडाले आहेत. कांबळे वस्ती येथील शेडवरील पत्रे वाऱ्याने उडून गेले. तसेच गावातील अनेक शेडचे नुकसान झाले आहे. वराडे येथे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच वीज वाहक तारांवर झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वराडेला पुन्हा वादळी पावसाने झोडपून काढले.