निवडणूक खर्च पडताळणी निरीक्षकांची कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भेट
कामकाजाची केली पाहणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्यावतीने नियुक्त केलेले निवडणूक खर्च पडताळणी निरीक्षक पी. सेंथील यांनी आज २६०- कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी २६० – कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे यांनी पी. सेंथील यांचे स्वागत केले. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, पी.पी.कोळी, गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.
आज दिनांक २३/१०/२०२४ रोजी पी. सेंथील यांनी प्रथम २६०- कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणूकीचे कामासाठी नियुक्ती केलेल्या सर्व पथकातील नोडल ऑफिसर यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये २६०- कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामधील सर्व निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर नियुक्त सर्व नोडल ऑफिसर यांना सेंथील यांनी कामकाजाबाबत आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. तद्नंतर त्यांनी लेखा शाखा कक्ष, पत्रव्यवहार कक्ष, उपकोषागार कक्ष, उमेदवार खर्च व भत्ते वाटप कक्ष, माध्यम (मीडिया) कक्ष, व्हिडिओ पाहणी पथक कक्ष, संगणक (आय टी सेल) कक्ष आदी कक्षांस भेट देऊन कामकाजाचा आढावा घेत सूचना केल्या. तसेच चालू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यापुढेही मतदारसंघामध्ये त्यांचा पाहणी दौरा राहणार असून संपूर्ण विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक खर्च विषयक बाबींवर नियंत्रण ठेऊन ते आयोगास वेळोवेळी अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती खर्च विषयक निरिक्षक सेंथील यांचे वतीने २६०- कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.