नातवाच्या उपचारांसाठींच्या खर्चासाठी वृद्ध आजोबांची गावोगावी भटकंती
दानशूरांकडे मदतीची याचना ; 12 लाख रुपयांची गरज
चांगभलं ऑनलाइन | रहिमतपूर प्रतिनिधी
रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील इयत्ता ८ वीत शिकणारा शाळकरी मुलगा आदर्श जाधव गेल्या अडीच वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असून तो पुणे येथील रुग्णालयात अॅडमिट आहे. त्याच्यावरील उपचारापोटी आत्तापर्यंत तब्बल ५० लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यासाठी या कुटुंबियांनी शेतीही विकून टाकली असून आणखी उपचारासाठी 12 लाखांची गरज आहे. त्यासाठी या कुटुंबाने राहते घर विकण्याची तयारीही केली आहे. मृत्यूशी झगडणाऱ्या या नातवाच्या पंखात बळ भरण्यासाठी त्याचे ६५ वर्षाचे आजोबा गावोगावी जावून मदत मागत आहेत. दरम्यान, समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन या कुटुंबाकडून करण्यात आले आहे.
आदर्श जाधव (वय १४,रा. रहिमतपूर ता. कोरेगाव) असे या चिमुरड्याचे नाव आहे. त्याला मेंदूचा आजार झाल्याने तो गेल्या अडीच वर्षापासून पुणे येथील रुग्णालयात अॅडमिट आहे. कुटुंबियांनी जमीन विकून आत्तापर्यंत त्याच्या दवाखान्याचा – खर्च केला. त्याच्यावर अजून उपचार सुरु असून पुढील खर्चासाठी त्याला मदतीची गरज आहे. शाळेत कमालीचा हुशार असणाऱ्या व प्रश्नमंजुषा स्पर्धेत बक्षीस मिळवलेला आदर्श हा रहिमतपूर येथे इयत्ता आठवीचे शिक्षण घेत होता. दोन वर्षापूर्वी आठवीमध्ये जावून एक महिना झला असतानाच त्याला ताप भरला. कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी दाखल केले. सुरुवातीला गावी, त्यानंतर कोरेगाव, सातारा येथे उपचार झाले, मात्र तब्येत सुधारण्याऐवजी बिघडतच गेली.
अखेर कुटुंबियांनी त्याला १ ऑगस्ट २०१७ रोजी पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केल्यानंतर आलेला ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर त्याच्यावरील धोका टळला. मात्र तो लगेच यातून बरा होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगताच कुटुंबियांचे अवसान गळाले.
आदर्शवरील होत असलेले उपचार अतिशय महागडे आहेत. आत्तापर्यंत त्याच्या कुटुंबियांनी तब्बल ५० लाख रुपये खर्च केले आहेत. आदर्शला आई, वडिल, आजोबा, आत्या असा परिवार आहे. आदर्शच्या आजोळच्या कुटुंबियांनीही त्याच्या उपचारासाठी जमीन विकली आहे तर इतर नातेवाईकांनी मदत केली आहे. मात्र उपचारासाठी आणखी सुमारे 12 लाख रुपयांची गरज असून त्याला पुढील उपचारांसाठी बेंगलोर येथील रुग्णालयात अॅडमिट करावे लागणार आहे.
आता पुढील खर्चासाठी जाधव कुटुंबियासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आदर्शचे आजोबा विनायक जाधव हे ६५ वर्षाचे
आहेत. ते रहिमतपूरसह परिसरातील आजूबाजूच्या गावामध्ये जावून नातवावर उपचारासाठी दानशूरांनी मदत करावी, असे आवाहन करत आहेत. दरम्यान, आदर्श हा शाळेत कमालीचा हुशार आहे. इयत्ता पाचवी, सहावीमध्ये असताना त्याने प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभाग घेवून बक्षीसे मिळवली आहेत. यासाठी रहिमतपूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये त्याचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष यांच्या हस्ते सत्कारही झालेला आहे.
आदर्श यातून सहीसलामत बाहेर सुखरुप बाहेर पडावा, यासाठी जाधव कुटुंब प्रयत्न करत आहेत. ज्यांना कोणाला ‘आदर्श’ला मदत करायची आहे त्यांनी आदर्शचे आजोबा विनायक बजरंग जाधव यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा रहिमतपूर येथे खाते असून त्याचा खाते क्रमांक AC no — 20215656357, IFSC: MАНВ- No-0000993 असा आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विनायक जाधव गुरूजी मोबाईल नंबर – 9175727404 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.