छ. शिवाजी महाराज स्टेडियमचे शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई – भूमिपूजन
वाखाण रोड रस्त्याच्या कामासही होणार प्रारंभ; एकूण १४६.५० कोटींचा निधी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडकराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून ९६.५० कोटींचा; तर वाखाण रोड ते कोरेगाव – कार्वे रस्त्यासाठी ५० कोटींचा विकासनिधी मंजूर झाला आहे. या निधीतून साकारण्यात येणाऱ्या या दोन्ही विकास प्रकल्पांचे ई – भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे. कराडमधील स्व. वेणुताई चव्हाण स्मृती भवनमध्ये आयोजित या ई-भूमिपूजन सोहळ्यासाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे नुतनीकरण व्हावे, अशी मागणी अनेक काळापासून कराड तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून होत होती. अशावेळी डॉ. अतुल भोसले यांनी स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आले असता, त्याच्यासमोर ही मागणी मांडून स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधीची मागणी केली होती. ना. फडणवीस यांनी डॉ. अतुल भोसलेंची ही मागणी तत्काळ मान्य करत, याचा आराखडा सादर करण्यास सांगितला होता. त्यानुसार डॉ. भोसले यांनी एका महिन्यातच क्रीडाप्रेमींशी चर्चा करुन स्टेडियमच्या विकासाचा आराखडा तयार करुन, ना. फडणवीस यांना सादर केला. महायुती शासनाने हा विकास आराखडा मंजूर करत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साकारण्यासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर केला.
याचबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या विशेष सहकार्यातून व डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून कराड शहरातील वाखाण रोड ते कोरेगाव – कार्वे रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीअंतर्गत ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्याचा विकास केला जाणार आहे.
या दोन्ही भव्य विकास प्रकल्पांचे ई – भूमिपूजन शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी ४ वाजता स्व. वेणुताई चव्हाण स्मृती भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यावेळी ना. फडणवीस मंत्रालयातून कराडवासीयांशी थेट संवाद साधणार असून, या प्रकल्पांचे ई – भूमिपूजन करतील. या कार्यक्रमाला कराडमधील सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा कराड दक्षिणच्यावतीने करण्यात आले आहे.