कराड प्रचार दौऱ्यात उदयनराजेंनी घरोघरी भेटी देत मतदारांशी साधला थेट संवाद
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रविवारी कराड येथील प्रचार दौऱ्यात घरोघरी भेटी देत परिसरातील मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात त्यांनी कराड शहरासह विद्यानगर, सैदापूर परिसरातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. या दौऱ्याची दिवसभर शहरात चर्चा होती. दरम्यान, ३० एप्रिल रोजी कराड येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सैदापुरातील नियोजित सभास्थळाची उदयनराजेंनी डॉक्टर अतुल भोसले, धैर्यशील कदम यांच्यासमवेत पाहणी केली.
महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांनी कराड तालुक्यातील प्रचारावर विशेष भर दिला आहे. आज कराड येथे आगमन होताच त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रचार दौऱ्यात खासदार भोसले यांच्यासमवेत भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड शहर, विद्यानगर व सैदापुरातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड येथे येत्या ३० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा घेण्यात येणार आहे. या सभेसाठी नियोजित असलेल्या सैदापूर येथील ३५ एकरवर पसरलेल्या विस्तीर्ण सभास्थळाची पाहणी करण्यात आली. पंतप्रधान मोदींची सभा ऐतिहासिक बनविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. तसेच सभेच्या तयारीला सोमवारपासून वेग येणार असून, सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात येणार असून, एक लाख लोकांची आसनक्षमता या मंडपात तयार करण्यात येणार असल्याचे खासदार भोसले यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, श्रीनिवास जाधव, सुनील काटकर, मोहनराव जाधव, राजेंद्रसिंह यादव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवदास, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, सुहास जगताप, उमेश शिंदे, प्रशांत कुलकर्णी, प्रमोद शिंदे, धनाजी जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.