कराडनजिक हृदयविकाराचा धक्का बसूनही चालकाने वाचवले 31 प्रवाशांचे प्राण : हृदयद्रावक घटनेत चालकाचा मृत्यू
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
एसटी चालकाला चालू एसटीबसमध्ये हृदयविकाराचा धक्का बसला. मात्र, अशावेळी प्रसंगावधान दाखवून एसटी चालकाने एसटी दुभाजकावर घालून थांबवली अन् बसमधील ३१ प्रवाशांचे प्राण वाचविले. मात्र, दुर्देवाने उपचार सुरू असताना चालकाचा मृत्यू झाला. राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर,
जि. सांगली) असे या कर्तव्यदक्ष एसटी चालकाचे नाव आहे.
ही घटना पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड नजिकच्या वारुंजी गावच्या हद्दीत काल सायंकाळी घडली.
याबाबतची माहिती अशी, चालक राजेंद्र बुधावले
व वाहक फारुक शेख हे विटा आगाराची विटा ते स्वारगेट एसटी घेऊन कडेगावमार्गे काल कराडला आले. कराड बसस्थानकातून एसटी साताऱ्याकडे जाण्यासाठी बाहेर पडली. त्यावेळी
गाडीत ३१ प्रवासी होते. पुणे-बेंगलोर महामार्गावर वारूंजी गावच्या हद्दीत गाडी आल्यानंतर चालक बुधावले यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान ओळखले आणि एसटी दुभाजकावर घालून थांबवली. वाहक शेख यांनी चालक केबीनजवळ जावून पाहिले. त्यावेळी चालक बुधावले हे प्रचंड घामाघुम झाले होते. चक्कर आल्याचे ते सांगत होते . त्यामुळे वाहक शेख यांनी तातडीने एसटीमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून त्यांना दुसऱ्या एसटीत बसवले. यावेळी वाहकासह गाडीत 31 प्रवासी होते.
चालक बुधावले यांना रिक्षातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला असल्याचे निदान केले. मात्र उपचार सुरू असतानाच बुधावले यांचा मृत्यू झाला. प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या कर्तव्यतत्पर चालक बुधावलेंच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एसटी वाहक फारुक कासीम शेख (रा. विटा) यांनी शहर पोलिसात या घटनेची खबर दिली आहे.