डॉ. सुरेश भोसले यांच्या ‘एव्हियन हेवन’ कॉफी टेबल बुकचे लोकार्पण
पश्चिम घाटातील जैवसंपदेचा चित्रमय आढावा; पगमार्क आर्ट गॅलरीतर्फे प्रकाशन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी छायाचित्रबद्ध केलेल्या ‘एव्हियन हेवन’ या कॉफी टेबल बुकचे लोकार्पण नुकत्याच एका कार्यक्रमात उत्साहात करण्यात आले. या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून पश्चिम घाटातील जैवसंपदेचा; विशेषत: पक्षीवैभवाचा चित्रमय आढावा घेण्यात आला आहे.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेले डॉ. सुरेश भोसले यांनी स्वत:चा छायाचित्रणाचा छंद जोपासत, गेल्या १० वर्षांत पश्चिम घाटातील विविध स्थळांना भेटी दिल्या आहेत. या भेटीत त्यांनी पश्चिम घाटात असणारे पक्षीवैभव आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. या जैवसंपदेचा चित्रमय आढावा घेणाऱ्या ‘एव्हियन हेवन’ अर्थात ‘पक्षांचे आश्रयस्थान’ या कॉफी टेबल बुकची निर्मिती, कोल्हापुरातील सुप्रसिद्ध पगमार्क आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आली आहे. कराड येथे नुकत्याच झालेल्या कृष्णा कृषी महोत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.
त्यानंतर कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकाचे लोकार्पण डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य रमण कुलकर्णी व जिल्हा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. मिश्रा म्हणाले, या कॉफी टेबल बुकच्या निमित्ताने डॉ. सुरेश भोसले हे एक अष्टावधानी व्यक्तिमत्व असल्याचे सिद्ध होते. आरोग्य, शिक्षण, सहकार, समाजकारण अशा विविध क्षेत्रात यशस्वी नेतृत्व करत असतानाच, फोटोग्राफीसारखा छंद जोपासून त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध केलेले पक्षीवैभव अवाक् करणारे आहे. यातून निसर्गाबद्दल त्यांच्या मनात असलेले अपरंपार प्रेम दिसून येते. त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जैवविविधतेच्या रक्षणाचे महत्व अधोरेखित केले असून, डॉ. भोसले हे खऱ्या अर्थाने एक तपस्वी मुनी आहेत, असे गौरवोद्गार डॉ. मिश्रा यांनी काढले.
या पुस्तकाचा परिचय करुन देताना राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य तथा पगमार्क आर्ट गॅलरीचे रमण कुलकर्णी म्हणाले, या कॉफी टेबल बुकमध्ये सुमारे २२० प्रकारच्या विविध पक्षांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. यातील बरेचसे पक्षी दुर्मिळ तसेच शिकारी पक्षी आहेत. त्यांचे फोटो टिपण्यासाठी जंगलात प्रचंड भटकंती करावी लागते. तसेच पक्षांच्या फोटोग्राफीसाठी संयम व पक्षांच्या वर्तनाचा अभ्यास असणेदेखील महत्वाचे असते. त्यामुळे डॉ. सुरेश भोसले यांचे हे पुस्तक केवळ छंद म्हणून काढलेल्या फोटोंचे नाही; तर दुर्मिळ जैवसंपदा लोकांसमोर यावी यासाठी निष्ठापूर्वक व अपार कष्ट घेऊन केलेला हा यशस्वी प्रयत्न आहे, असेच म्हणावे लागेल.
या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल आणि आपल्या फोटोग्राफीच्या छंदाबद्दल बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्या १० वर्षात भारतातील विविध राज्यात आणि परदेशात केलेल्या निर्सग भटकंतीवेळी केलेल्या पक्षी छायाचित्रणातून हे कॉफी टेबल बुक सिद्ध झाले आहे. पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध असून, पक्षी हा या जैवविविधतेतील एक महत्वाचा घटक आहे. अलीकडे पक्षांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊ लागल्या असून, ही दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊ लागली आहे. याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठीच पक्षी छायाचित्रणाचा छंद जोपासत, या पुस्तकाच्या निमित्ताने पक्षांचे हे आश्रयस्थान वाचकांसमोर आणता आल्याचा मनस्वी आनंद होत आहे.
कार्यक्रमाला कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, श्री. विनायक भोसले, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, बबनराव शिंदे, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक राम पाटील, जयवंत शुगर्सचे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, प्राचार्य डॉ. यु. एस. सुतार, डॉ. सी. बी. साळुंखे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कृष्णा विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे, कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजूलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रोहन भाटे यांनी प्रास्तविक केले. ज्योत्स्ना गांधी यांनी आभार मानले.
पुस्तकविक्रीतून जमा होणारी रक्कम कर्करोगग्रस्तांच्या उपचारासाठी!
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले हे स्वत: निष्णात सर्जन असून, स्तन कर्करोग उपचार तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘एव्हियन हेवन’ या कॉफी टेबल बुकच्या विक्रीतून जमा होणारी रक्कम कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या या कृतीचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.