चांगभलं ऑनलाइन | पुणे
महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक समुदाय एकत्र येत असेल तर त्यात पोटजाती काढणं योग्य नाही. मराठा समाजातील गरीब लोकांना मदत झाली पाहिजे. गरीब मराठ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठीच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्यांच्या वाटेत हस्तक्षेप करणं किंवा खोडा घालणं हे योग्य नाही,
त्यामुळे आरक्षणाच्या मागणीत खोडा घालू नका, असा सल्लाच शरद पवार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानावर बोलताना दिला. ते आज पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना सांगितलं की, राज्य सरकारचा आणि त्यांचा काही संवाद झाला आहे. त्यात कालावधी ठरल्याचं कळलं. सरकार काय करतंय त्याकडे आमचं लक्ष आहे. यातून मार्ग निघाला आणि प्रश्न सुटला तर आनंद वाटेल, असंही त्यांनी सांगितलं.
कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करताना शरद पवार यांच्या आशीर्वादानेच कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी केला होता. त्यावर पवार म्हणाले, या निर्णयाला माझा आशीर्वाद असल्याचं मी वाचलं. मी काही मंत्रिमंडळाच्या बैठकांना उपस्थित राहत नाही. ज्यावेळी याबाबतचा निर्णय घेतला गेला. त्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची संमती होती आणि आज त्यावर ते भाष्य करत नाहीत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
कंत्राटी कामगाराबाबतची अस्वस्थता कशाची होती तर नोकरीत कन्फर्मेशन नाही. ठरावीक काळासाठी नोकरी होती. 10-11 महिन्यासाठी नोकरी म्हटल्यावर त्याच्या जीवनात स्थैर्य नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने जागा भरणं योग्य नाही. ही आमची भूमिका होती. फडणवीस यांनी आता जी मतं मांडली आहेत, मात्र या निर्णयाला यापूर्वीच्या त्यांच्या सरकारने किंवा त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी संमती दिली होती. त्यांच्या संमतीने हे निर्णय झाले होते ही गोष्ट लपवण्यात अर्थ नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर बोलताना पवार म्हणाले, बावनकुळे यांचे जनमाणसात काय स्थान आहे,? विधानसभेवेळी त्यांना त्यांच्या पक्षाने तिकीट दिलं नाही. तिकीट द्यायलाही लायक नाही असं त्यांच्या पक्षाला वाटलं, त्याच्याबद्दल काय बोलायचं? असा टोला पवारांनी लगावला. बातमी छापून यावी असं वाटत असेल त्यामुळे बावनकुळे वारंवार बारामतीचा उल्लेख करतात. पक्षाला ज्यांना तिकीट द्यावसं वाटत नाही त्यांनी बारामतीत येऊन बोलू नये, असेही पवार म्हणाले.
आमचे डोळे पावसाकडे
यंदा राज्यातील 30 ते 35 टक्के भागात पुरेसा पाऊस पडला नाही, मागच्या दोन वर्षाचा अनुभव पाहिला तर दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडतो. तसं झालंच तर धरणे भरू शकतात. त्याकडे आम्ही पावसाकडे डोळे लावले आहेत. पण तसं नाही झालं तर राज्याला आणि केंद्राला संकटग्रस्तांना बाहेर कसं काढायचं याचा मोठा कार्यक्रम आखावा लागेल, असंही शरद पवार यांनी सांगितलं.