सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा रक्कमेचे वाटप सुरू
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हयात मागील खरीप हंगामामध्ये दुर्देवाने अतिशय कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक उत्पादनात फटका बसल्याचे दिसून आले. पर्यायाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग नोंदविल्यामुळे २ लाख २७ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम रु. ११५ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकतीच विमा कंपनीद्वारे जमा करण्यात आलेली आहे. पिक विम्या पोटी मिळालेली ही रक्कम सातारा जिल्हयाच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
खरीप हंगाम २०२३ मध्ये सातारा जिल्ह्यातील पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रति अर्ज १ रुपये प्रमाणे पीक विमा हप्ता भरुन या योजनमध्ये सहभाग घेता येतो. त्यानुसार जिल्हयातील शेतकऱ्यांकडून फक्त २ लाख ७६ हजार रुपये एवढा हप्ता विमा कंपनीस जमा करण्यात आला होता. उर्वरित विमा हप्त्याची रक्कम केंद्र व राज्य शासनाने विमा कंपनीस अदा केली आहे.
जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की, सध्या निसर्गाचा लहरीपणा वारंवार अनुभवास येत असल्यामुळे आपल्या शेतातील पिकाचा पीक विमा उतरवून या प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये फक्त १ रुपया भरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या नजीकच्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवती सहकारी बँक, महा ई सेवा केंद्र, विमा कंपनी प्रतिनिधी, योजनेचे पोर्टल अथवा पोस्ट कार्यालय यांचेशी संपर्क साधून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दिनांक १५ जुलै २०२४ पूर्वी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.