मुसद्दीक आंबेकरी परिवाराकडून निराधार महिलांना नवीन कपडे व दिवाळी फराळ वाटप
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते मुसद्दीक आंबेकरी व त्यांच्या परिवाराकडून बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या येथील आशाकिरण महिला वसतिगृहात महिलांना दिवाळी निमित्त नवीन कपडे व फराळ तसेच महिलांना आवश्यक असणारे साहित्य, विद्यार्थी मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून आंबेकरी परिवाराने निराधार महिलांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अशाकिरणचे अधीक्षक अविनाश म्हासुर्णेकर व ऑफिस कर्मचारी तसेच सर्व महिलांनी आंबेकरी परिवाराला धन्यवाद दिले. सामाजिक कार्यकर्ते मुसद्दीक आंबेकरी यांनी माणुसकी या नात्याने आपआपल्या भागातील सर्वसामान्य नागरिकांना आपण सर्वांनी मिळून तसेच समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन गोरगरीबांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी मदत केली पाहिजे व सर्व सामान्य लोकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले. तसेच सर्वांनी दिवाळी व नेहमीची खरेदी स्थानिक दुकानदारांकडून करावी, त्यामुळे स्थानिक दुकानदारांची सुद्धा दिवाळी गोड होईल, असे आवाहन केले.
दरम्यान, यावेळी सर्व महिलांनी मनापासून आशीर्वाद दिले, त्यामुळे आपणाला गरजूंना काही मदत करता आली, यांचे समाधान मिळाल्याचे मुसद्दीक आंबेकरी यांनी सांगितले.