आझाद विद्यालयात वारकरी दिंडीचा भक्तिमय उत्सव; विद्यार्थ्यांचा पारंपरिक सहभाग लक्षवेधी

कराड प्रतिनिधी, दि. ६ | चांगभलं वृत्तसेवा
महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारसा जपत, आझाद विद्यालय कासेगाव येथे दिनांक ५ जुलै रोजी भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात वारकरी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात सहभागी होत पंढरपूर वारीचा अनुभवच उपस्थितांना दिला.
या दिंडीचे नियोजन मुख्याध्यापक एस. एस. पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक विभागप्रमुख एन. पी. जाधव सर, तसेच संपूर्ण शिक्षकवृंदांनी केले. गावातील प्रमुख मार्गांवरून दिंडीचे वाजतगाजत मार्गक्रमण झाले. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ विद्यार्थिनींनी फुगडी खेळून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या हॉलमध्ये विद्यार्थिनींनी भक्तिगीते आणि संतांचे अभंग सादर केले. यासाठी सहाय्यक शिक्षक आर. एस. पांढरबळे आणि ह. भ. प. सयाजी डंबे (नाना) यांची विशेष साथ लाभली.
शेवटी विद्यालयाच्या क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी गोल रिंगण तयार करून फेर धरला. संपूर्ण परिसर ‘पांडुरंग… पांडुरंग…’ च्या गजरात भारावून गेला.
या सोहळ्याला मुख्याध्यापक एस. एस. पवार, कार्याध्यक्षा एस. एन. पाटील मॅडम, उपकार्याध्यक्ष आर. एस. पांढरबळे, सांस्कृतिक प्रमुख एन. पी. जाधव, क्रीडा शिक्षक पी. टी. पाटील, आर. व्ही. भोई, आर. पी. पवार यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक समृद्धीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला असून ग्रामस्थ व पालकांनी याचे विशेष कौतुक केले.