
पलूस | विशेष प्रतिनिधी
पलूस (Sangali) तालुक्यातील धनगर समाजाने एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी आपल्या शेळ्या-मेंढ्यांसह गुहागर-विजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तहसील कार्यालयापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली. पिवळे झेंडे, पिवळ्या टोप्या, पिवळे तारक धनगर समाज बांधवांनी परिधान केले होते. यावेळी ” येळकोट येळकोट जय मल्हार“चा जयघोष आंदोलनकर्त्यांनी केला.
धनगर समाजाकडून एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात जोरदार आंदोलन सुरू आहे. मंगळवारी पलूस (palus) तालुक्यातील धनगर समाज समितीकडून रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते. गुहागर-विजापूर महामार्गावर झालेले आंदोलनाला धनगर समाज बांधवांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. गेली अनेक वर्षे धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी शासन दरबारी संघर्ष करीत आहे पण त्याला यश आलेले नाही. त्यामुळे शासनाला जाग यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी पलूस तालुक्यातील धनगर (dhangar samaj) समाज बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पिवळे झेंडे हातात घेतले होते. पिवळ्या टोप्या, पिवळे स्कार्फ परिधान केले होते. पारंपारिक वेशातील धनगर समाज बांधव अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. आपल्या शेळ्या-मेंढ्यांसह धनगर समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाल्याने हे आंदोलन लक्षवेधक ठरले. यावेळी धनगर समाजातील आंदोलनकर्त्यांनी एसटी आरक्षणाची जोरदार मागणी केली. त्यानंतर महामार्गापासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली.