ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन
तयारी अंतिम टप्प्यात; डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली पाहणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीची पाहणी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली. यावेळी त्यांनी या कृषी महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती दिली.
शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती व शेतीसाठी असणारे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णाकाठाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १७ ते २१ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले यांनी महोत्सव स्थळाला भेट दिली. यावेळी बोलताना डॉ. अतुलबाबा म्हणाले, या महोत्सवात ११ देशातील कृषी तज्ज्ञ येणार असून पशु, फुले व फळे अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या महोत्सवामुळे या भागातील लोकांच्या कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार श्री. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांच्यासह राज्यभरातील विविध साखर कारखान्यांचे चेअरमन, संचालक व कृषी क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मोठया संख्येने स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. विशेषतः उद्घाटन सत्र व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य शामियाना उभारण्यात येत आहे. या महोत्सवात होणाऱ्या कृषी परिसंवादांसाठी स्वतंत्र सभागृहाचीही उभारणी करण्यात येत आहे. कराडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन होत असून, यासाठी ११ देशातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी वातानुकूलित एसी सभागृहाची उभारणी करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. या महोत्सवाला शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने भेट देतील, असा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, उमेश शिंदे, रमेश मोहिते, अभिषेक भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक संकल्पनेवर आधारित प्रवेशद्वाराची रचना
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष सर्वत्र साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे प्रवेशद्वार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संकल्पनेवर उभारण्यात येत आहे. त्याचसोबत अयोध्या येथे प्रभू श्री रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्री रामाची प्रतिमा प्रवेशद्वाराजवळ उभारली जाणार असून, हे या महोत्सवाचे आगळे-वेगळे आकर्षण ठरणार आहे.