सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात कराडात शेतकरी संघटनांची निदर्शने, शासकीय आदेशाची होळी

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
केंद्र शासनाने साखर कारखान्यांना केलेली इथेनॉल निर्मिती बंदी, कांदा व साखर निर्यात बंदी या विरोधात मंगळवारी शेतकरी संघटनांच्यावतीने कराड शहरात जोरदार आंदोलन करत प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कांदा व साखर निर्यात बंदीच्या आदेशाची होळी करण्यात आली. शेतकरी संघटनांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्यास बंदी केलेली आहे. तसेच साखर व कांदा निर्यात बंदी केलेली आहे आणि खाद्य तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली आहे. यामुळे देशातला शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. सरकारने इथेनॉल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलेले होते, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला थोडाफार दिलासा मिळाला होता, तोही आपल्या इथेनॉल बंदी निर्णयामुळे आणि साखर व कांदा निर्यात बंदीमुळे, साखर व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात केल्यामुळे देशांतर्गत सोयाबीन व तेलबिया पिकवणारा शेतकरी योग्य भाव मिळत नसल्यामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. या सर्व संकटाला आपल्या केंद्र सरकारची आयात व निर्यात धोरणे कारणीभूत आहेत. सरकारने घेतलेले सर्व निर्णय शेतकरी विरोधी आहेत, हे सर्व निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावेत व इथेनॉल बनवण्यास साखर कारखान्याला परवानगी द्यावी व साखर व कांदा निर्यातीस तात्काळ परवानगी द्यावी आणि आयात केलेल्या खाद्यतेलावर पन्नास टक्के आयात शुल्क लावून देशातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांच्यावतीने करण्यात आली.
दरम्यान, सरकारने घेतलेले निर्णय डिसेंबर अखेर मागे न घेतल्यास सर्व शेतकरी संघटनेसह हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली येथे जंतर-मंतर या ठिकाणी सरकारच्या विरोधात तीव्र बेमुदत आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनांच्यावतीने देण्यात आला.
या आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील , जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई अॅड. समीर देसाई , बीअआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, बळीराजा संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश शेवाळे आदी पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते.