ठरलं ! विधानसभेला कराड दक्षिणमधून सकल मराठा समाजाचे सातजण इच्छुक ; जरांगे-पाटील घेणार अंतिम निर्णय – changbhalanews
राजकिय

ठरलं ! विधानसभेला कराड दक्षिणमधून सकल मराठा समाजाचे सातजण इच्छुक ; जरांगे-पाटील घेणार अंतिम निर्णय

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वादळ उठवणारे मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सकल मराठा समाजाचा उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात टक्कर देणार आहे. त्यासाठी सात जण इच्छुक असून इच्छुकांचे अर्ज आणि बायोडाटा मराठा समाज समन्वयकांनी मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे दिले आहेत. त्यामुळे कराड दक्षिणच्या उमेदवारीबाबत मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, कोणाला उमेदवारीची संधी देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण हे करत आहेत. गतवेळी त्यांच्या विरोधात भाजपच्या डॉक्टर अतुल भोसले यांनी लढत दिली होती. येणाऱ्या निवडणुकीतही पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोघांनी विधानसभेची तयारी गेल्या काही महिन्यापासूनच वेगाने सुरू केली आहे.

दरम्यानच्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रान उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडून राज्यभरातील विविध मतदार संघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यांच्या आवाहनानुसार काही दिवसांपूर्वी कराडच्या शासकीय विश्रामगृहावर कराड दक्षिण , उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातील मराठा समाज समन्वयकांची संयुक्त बैठक पार पडली होती. त्यावेळेला दुसऱ्या बैठकीत सर्वांकष चर्चा करून इच्छुकांची नावे फायनल करण्याचा व त्याबाबतचा अहवाल मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसात दुसरी बैठकही पार पडली. त्यामध्ये कराड दक्षिण मधून महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात टक्कर देण्यासाठी सात जण इच्छुक म्हणून पुढे आले आहेत. त्यांची संपूर्ण माहिती व त्याबाबतचा सविस्तर अहवाल शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी कराड तालुक्यातील मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे पाटील यांना समक्ष भेटून त्यांच्याकडे सुपूर्द केला.

त्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत असणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी निर्णय घेऊन सात इच्छुकांमधील एकाची उमेदवारी फायनल केल्यास आता सकल मराठा समाजाचाही उमेदवार दक्षिण मधून मैदानात उतरलेला दिसेल.

कराड उत्तर व पाटणचा लवकरच निर्णय…

कराड मधील सकल मराठा समाज समन्वयकांनी कराड दक्षिण मधील विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांची नावे मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे पाठवली असली तरी अजून कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची नावे पाठविण्यात आलेली नाहीत. या दोन्ही मतदारसंघातील मराठा समन्वयकांची लवकरच बैठक होऊन इच्छुक उमेदवारांची नावे सर्वानुमते फायनल करून ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी समन्वयकांकडून जरांगे पाटील यांना सांगण्यात आले.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी चार दिवसांपूर्वीच घेतली होती मनोज जरांगे पाटील यांची भेट…

चार दिवसांपूर्वी कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दोन्ही बाजूकडून त्याबाबत अद्याप काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर कालच मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून कराड दक्षिण मधील इच्छुकांची यादी त्यांच्याकडे सुपूर्द केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मनोज घोरपडे यांनीही सातारा दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांची घेतली होती भेट…

कराड उत्तर मधून गतवेळी निवडणूक लढवलेले व भाजपचे कराड उत्तर निवडणूक प्रभारी मनोज घोरपडे यांनीही काही दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. ही भेट आणि चर्चा कोणत्या संदर्भाने होती, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात या भेटीची चर्चा जोरात सुरू आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close