जनकल्याणच्या सीबीएसई स्कूलसाठी सायरस पूनावाला सर्वोतोपरी सहकार्य करेल
जसविंदर नारंग : डॉ. सायरस एस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल व सरस्वती शैक्षणिक संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
काळाची पाऊले ओळखत जनकल्याण प्रतिष्ठानने सीबीएसई माध्यम शाळा सुरू करून कराड परिसरातील विद्यार्थांना अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी सायरस पूनावाला त्यांना सोबत करेल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण प्रक्रिया ही महत्त्वाची बाब असून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात संस्काराबरोबर विविध कलागुणांचा विकास करावा, असे मत सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ जसविंदर नारंग यांनी व्यक्त केले.
कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रतिष्ठान संचलित डॉ. सायरस एस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल व सरस्वती शैक्षणिक संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन जसविंदर नारंग यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, सचिव अनिल कुलकर्णी, जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष मिलिंद पेंढारकर, डॉ.अविनाश गरगटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नारंग म्हणाले, कृष्णा नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात असलेली ही शाळा अत्यंत रमणीय आहे. तसेच या शाळेतील भौतिक सुविधा अत्यंत दर्जेदार आहेत. विद्यार्थ्यांनी या गोष्टींचा फायदा घेऊन प्रसन्न वृत्तीने ज्ञानार्जन करावे.
सी.ए.शिरीष गोडबोले म्हणाले, शाळेची स्वतःची सुसज्ज इमारत असणे हे आमचे स्वप्न होते आणि प्रत्यक्षात हे स्वप्न पूर्ण झाल्याने मनस्वी आनंद होत आहे. यासाठी विलू पूनावाला फाउंडेशनने केलेली भरीव मदत खूप मोलाची आहे.
जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अनिल कुलकर्णी, डॉ.अविनाश गरगटे यांनी मनोगत व्यक्त केले. जनकल्याण प्रतिष्ठानच्या २५ वर्षाच्या वाटचालीचे अवलोकन करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. सायरस एस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच सरस्वती शिशुवाटिका विद्यामंदिर व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले यांच्या हस्ते सायरस पूनावालाचे उपस्थित मान्यवर जसविंदर नारंग, तसेच विजय कोल्हटकर, अभिजित पाटील, रोहित शिंदे यांचा तसेच जनकल्याण पतसंस्था अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, मिलिंद पेंढारकर यांचाही सत्कार करण्यात आला.
सचिव अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. गीतांजली तासे यांनी आभार मानले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अरिहा शहा हिने पसायदानचे गायन केले. प्रतिष्ठानच्या विश्वस्त गीतांजली तासे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जनकल्याण प्रतिष्ठानचे खजिनदार राजेश काळे, प्रतिष्ठानचे विश्वस्त सुनील मुंद्रावळे, नितीन गिजरे , श्रीपाद कुलकर्णी, गिरीश ताम्हणकर, संतोष देशपांडे, माधुरी साने आदींची उपस्थिती होती.
झांज, लेझीम अन् विद्यार्थिनींचा सत्कार…
डॉ.सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल व सरस्वती शैक्षणिक संकुल च्या नूतन वास्तूचे उद्घाटनप्रसंगी विद्यार्थांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झांज व लेझिम च्या पथकाने वादन करत केले. कोनशिला अनावरण, सरस्वती पूजन, शाळेचे इमारतीचे उद्घाटन करत मान्यवरांनी शालेय नूतन वास्तूची पाहणी करून उपक्रमांची माहिती घेतली. जनकल्याण प्रतिष्ठान च्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा व सामाजिक कार्याचा माहितीपट याप्रसंगी दाखविण्यात आला. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनी अदिती जाधव व लावण्या जाधव यांचा सत्कार करण्यात आला.