समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोठे : डॉ. अतुलबाबा भोसले
कराड येथे मराठी पत्रकार दिन सोहळा उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याचे काम पत्रकार करत असतात. समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कराड येथे मराठी पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर कृष्णा विश्व विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर व कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर बोलताना डॉ. भोसले म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला. मराठी पत्रकारितेत अनेक मान्यवरांनी मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्याच पाऊलवाटेवर वाटचाल करत समाजभान जागृत करण्याचे काम आजचे पत्रकार करत आहेत. पत्रकारिता जोपासत असताना पत्रकारांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. पत्रकारांना आरोग्यविषयक मदतीसाठी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून सदैव सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. कृष्णा विश्व विद्यापीठाचे प्रसिद्धी अधिकारी सुशील लाड यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा कारखान्याचे प्रसिद्धी अधिकारी अतुल मुळीक यांनी आभार मानले.