बांधकाम कामगारांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार
वैद्यकीय नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरु; कुटुंबियांनाही मिळणार लाभ
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांना वैद्यकीय योजनांचा लाभ दिला जातो. याअंतर्गत येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. या कामगारांच्या वैद्यकीय नोंदणीसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्षाची सुरुवात आजपासून करण्यात आली.
महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्व बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी डॉ. अतुल भोसले विशेष प्रयत्नशील आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना २ लाखापर्यंतच्या उपचार सुविधांबरोबर अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधा आता कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्याने बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी सोय झाली आहे.
कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे आणि कृष्णा विश्व विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या कक्षामध्ये नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय नोंदणी केली जाणार आहे. तसेच २४ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.
यावेळी बोलताना श्री. माशाळकर म्हणाले, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटल समाजातील तळागाळातील घटकांसाठी सातत्याने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असते. बांधकाम कामगार हा आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या; पण समाजाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या घटकासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल सदैव तत्पर असून, या कक्षाला भेट देऊन, बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी विविध वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा.
याप्रसंगी कृष्णा हास्पिटलच्या विमा अधिकारी प्रियांका पवार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक विक्रम पाटील, विक्रम पवार, माणिक साळुंखे, धनाजी माने यांच्यासह हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वैद्यकीय योजनेचा लाभ कसा मिळवाल?
नोंदीत बांधकाम कामगार, त्याची पत्नी अथवा पती, त्यांची १० वर्षांवरील पहिली २ अपत्ये, तसेच नोंदीत कामगाराचे आई – वडील किंवा सासू – सासरे यांना या वैद्यकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे. वैद्यकीय नोंदणीसाठी येताना लाभार्थीने नोंदणी कार्ड व आधार कार्ड, तसेच संबंधित नातेवाईकांचे आधारकार्ड घेऊन यावे, असे आवाहन कृष्णा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.