इचलकरंजीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट कराडला उघड
रेकॉर्डवरील पाच जण गजाआड ; तीन देशी बनावटीची पिस्तुले जप्त ; कराड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील एका माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघडकीस आणत धरपकड करून गंभीर गुन्हे नोंद असलेल्या रेकॉर्डवरील पाच संशयितांच्या टोळीला गजाआड केले आहे. अटक केलेल्या संशयतांच्या टोळीकडून २ दुचाकीसह ३ देशी बनावटीची पिस्तुले व घातक हत्यारे मिळून ३ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेली संशयितांची टोळी इचलकरंजीतील ‘गेम प्लॅन’ साठी पैसे जमविण्याच्या हेतूने कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती , अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विद्यानगर-सैदापूर (कराड) येथे करण्यात आली.
याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक अॉंचल दलाल यांनी प्रमुख पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत सातारा येथील पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड हे सातारा जिल्हयातील एक मोठी बाजारपेठ व पुणे बेंगलोर महामार्गावरील मध्यवर्ती शहर असलेल्या कराड शहराला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शहरातील या घडामोडींकडे व तसेच रेकॉर्डवरील संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी शहर पोलिसांना दिल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक २० मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरामध्ये गस्त घालत होते. यादरम्यान विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही इसम सशस्त्र दरोडा टाकण्याचे तयारीत असून तात्काळ त्याठिकाणी जावून कारवाई करणेबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुचित करण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच विद्यानगर परिसरात अगोदर गस्त घालत असलेले पोलीस हवालदार शशिकांत काळे व संग्राम पाटील हे तातडीने जयराम कॉलनी येथे संशयितांच्या फ्लॅटवर पोहोचले.
पोलिसांसोबत झटापट….
पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी हवालदार शशिकांत काळे व हवालदार दिग्विजय सांडगे यांनी संशयितांवर झडप घातली. त्यावेळी संशयितांची आणि पोलिसांची झटापट झाली. तरीही पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले, काही वेळातच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस अंमलदार अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे अनिल स्वामी, संग्राम पाटील, महेश शिंदे यांचे पथक घटनास्थळी आले. या पथकाने आणखी दोघांना पकडले. मात्र एक जण पसार झाला. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे पिस्तुले, सुरा, कोयता यासारखी हत्यारे होती. त्यांना ही हत्यारे चालवायला संधी मिळाली असती तर पोलिसांच्या जीवावर बेतले असते.
पाच जणांची टोळी जेरबंद…
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून संशयित आरोपी १) बबलु उर्फ विजय संजय जावीर वर्षे रा.शहापुर ता. हातकणंगले जि. कोल्हापूर २) निकेत वसंत पाटणकर रा. गोडोली ता. जि. सातारा . ३) सुरज नानासो बुधावले रा. विसापूर ता. खटाव जि.सातारा ४) राहुल अरुण मेनन रा. केरळ सध्या रा. विद्यानगर कराड या चौघांना अटक केली. तर पळून गेलेल्या ५) आकाश आनंदा मंडले रा. खटाव जि.सातारा या संशयिताला मंगळवारी पोलिसांनी अटक केली.
पिस्तुले व घातक शस्त्र जप्त…
पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींच्या टोळीकडून ३ देशी बनावटीची पिस्तुले, ४ जिवंत काडतुसे, १ धारधार सुरा, २ कोयते व इतर दरोडयाचे साहित्य दोन दुचाकी असा एकून ३ लाख ३७ हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला.
अटक केलेले सर्व रेकॉर्डवरील संशयित…
अटक केलेल्या संशयित आरोपींवर खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, आर्म अॅक्ट यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये बबलू उर्फ विजय जावीर याच्यावर खुन, दरोडा, जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत.
निकेत पाटणकर यांच्यावर खुन, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे एकूण ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत, सुरज बुधावले याच्यावर खुन, आर्मॲक्ट, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक….
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर , कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रोहित फार्णे, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार विवेक गोवारकर, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, प्रविण काटवटे, सचिन सुर्यवंशी, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, महेश शिंदे, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, धीरज कोरडे, मुकेश मोरे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, संदिप शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पोलीस हवालदार शरद बेबले, प्रविण फडतरे, लैलेश फडतरे, साबीर मुल्ला, अविनाश चव्हाण, रोहित निकम, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन यांच्या पथकांनी केली.
‘गेम प्लॅंन’चे कारण खून का बदला खून!
पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांच्या टोळीने इचलकरंजी येथील एका माजी नगरसेवकाची हत्या करण्याचा कट रचला होता. या नगरसेवकाचे सार्वजनिक गणेश मंडळ आहे. तर आरोपी मधील बबलू उर्फ विजय जावीर हाही इचलकरंजी येथील दुसऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाचा सदस्य आहे. जावीर याचा पूर्वी अवैध पायरेटेड सीडी तयार करण्याचा व्यवसाय होता. त्याची टिप माजी नगरसेवकाच्या मंडळातील एकाने पोलिसांना दिल्याने जावीर याच्यावर कारवाई झाली होती. त्याच्या रागातून जावीर आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिस्पर्धी मंडळातील एकाची हत्या केली. या गुन्ह्यात जावीर हा बारा वर्षे कारागृहात होता. दरम्यान, हत्या झालेल्या मंडळाच्या संबंधित काही जणांनी मिळून जावीर याच्या मंडळाशी संबंधित एकाची हत्या केली. कारागृहात असताना जावीर याने निकेत पाटणकर, सुरज बुधावले अशा काही जणांची टोळी जमवली. या टोळीच्या माध्यमातून पैसे उभा करून प्रतिस्पर्धी मंडळातील माजी नगरसेवकाची हत्या घडवून आणण्याचा कट जावीर याने रचला होता. त्यासाठी पैसे उभा करण्याकरता ही टोळी कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत ही होती. मात्र कराड पोलिसांच्या हाताला ही टोळी लागली आणि माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट उघड झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
पोलिसांच्या कामगिरीची एसपींकडून दखल ; रिवॉर्ड देणार…
माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट उघडकीस आणून पाच जणांना जेरबंद करणाऱ्या कराड पोलिसांच्या पथकाला, विशेषता पोलीस हवालदार शशिकांत काळे व दिग्विजय सांडगे यांना रिवार्ड देण्यात येईल, अशी घोषणा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत केली.