काँग्रेसने दिली महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर ‘या’ राज्याची जबाबदारी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार पराभूत झालेल्या मध्य प्रदेश राज्याची जबाबदारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे समन्वयक म्हणून उत्तमरीत्या जबाबदारी पार पाडलेल्या माजी मुख्यमंत्री आ. चव्हाण यांच्यावर ही आव्हानात्मक जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. त्यांना मध्य प्रदेशात सर्व जागावर हरलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याबरोबरच संघटनात्मक पक्ष बांधणी बळकट करावी लागणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या राज्यांतील निकालाचा आढावा घेण्यात येत आहे . त्यानुसार काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यनिहाय समिती स्थापन केल्या आहेत. मध्यप्रदेश राज्याची जबाबदारी पक्षाकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आ. चव्हाण यांच्यासह समितीमध्ये सप्तगिरी उल्का, आ. जिग्नेश मेवानी यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यप्रदेश बरोबरच छत्तीसगड, ओडिसा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा आदी राज्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी असमाधानकारक झाली आहे. अशा राज्यात समित्या स्थापन केल्या असून पक्षाच्या जेष्ठ नेत्यांना त्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही पदे भूषविली आहेत. काँग्रेस पक्षाकडून सहा राज्यात प्रभारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. यासह केंद्रात काँग्रेसचे आघाडी सरकार असताना मित्र पक्षांसोबत समन्वयक म्हणून सुद्धा अत्यंत महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. यामुळेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मध्य प्रदेश राज्याची महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. मध्य प्रदेश काँग्रेसला उर्जितावस्था आणण्याची किमया आ. पृथ्वीराज चव्हाण कशी साधणार ते येणाऱ्या काळात दिसेल.